बर्लिन : रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे टीकाकार अलेक्सी नवलनी यांना 32 दिवसांनी जर्मनीच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. नवलनी यांना नर्व एजंटचा वापर करत विष देण्यात आले होते, असा संशय आहे. 32 दिवसांच्या देखभालीनंतर नवलनी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती बर्लिनच्या ‘चॅरिटी’ रुग्णालयाने बुधवारी दिली आहे.
नवलनी हे पुतीन यांचे कडवे विरोधक आहेत. 20 ऑगस्ट रोजी सायबेरिया येथून मॉस्को येथे जात असताना विमानात नवलनी हे अत्यवस्थ झाले होते. रशियातील त्यांच्या उपचारासंबंधी संशय असल्याने त्यांना जर्मनीत आणले गेले होते. तेथे नवलनी हे दोन आठवडय़ांपर्यंत कोमामध्ये राहिले होते.
विषप्रयोगात रशियाच्या सरकारचा हात असल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱयांनी केला होता. परंतु रशियाच्या अधिकाऱयांनी हा आरोप फेटाळला आहे. जर्मनीतील डॉक्टरांनीही नवलनी यांच्यावर विषप्रयोग झाला असण्याची शक्यता वर्तविली आहे.









