पालक सचिव प्रवीण दराडे ; संभाव्य पूरपरिस्थिती समन्वयाने हाताळण्याचे निर्देश; स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक सर्व सुविधा पुरवा
प्रतिनिधी / कोल्हापूर
पूर परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन पूरपरिस्थिती पूर्व, पूरपरिस्थिती काळ व पूर परिस्थितानंतर आवश्यक असणाया कामाचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करुन सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी, असे निर्देश पालक सचिव प्रवीण दराडे यांनी बुधवारी येथे दिले. तसेच अलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा, असेही निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिह्याच्या पूर परिस्थिती नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
अधिक वाचा- जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट
दराडे म्हणाले, अलमट्टी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत कर्नाटक राज्याच्या पाटबंधारे विभागाशी तसेच कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबतही पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही त्रुटी राहता कामा नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. कोणतीही घटना घडल्यास तत्काळ त्याठिकाणी पोहचण्यासाठी विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना करुन आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी ’टीम लीडर’ म्हणून तर अन्य सर्व विभागांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ’टीम वर्क’ म्हणून काम करावे.
पूरबाधित नागरिकांचे व जनावरांचे वेळेत स्थलांतर करा. स्थलांतरीतांच्या कँम्पमध्ये सर्व सेवासुविधा उपलब्ध करुन द्या. नेमुन दिलेल्या अधिकाऱयांनी त्या-त्या ठिकाणांची पाहणी केल्याचा अहवाल मागवून घ्या. पुराचे पाणी येणाऱया मार्गांवर व पुलांवर पोलीस कर्मचारी तैनात ठेवा. रोगराई पसरु नये, यासाठी पुरबाधित नागरिकांना व स्थलांतरीत कँम्पमध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा करा. नागरिकांनी शुध्द अथवा उकळून पाणी पिण्याबाबत जनजागृती करा. जंतुनाशक फवारणी व अन्य आवश्यक ती खबरदारी घ्या. महामार्गांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे आपघात घडू नये, यासाठी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा प्रशासनातर्फे पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांनी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
पुराचे पाणी पाहण्यास जाऊ नका : प्रवीण दराडे
सध्या पाऊस सुरु असून नदी पात्रातील पाणी धोका पातळीवर जाईल, त्यावेळी पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन पालक सचिव प्रवीण दराडे यांनी केले. दराडे म्हणाले, जिल्हा प्रशासनावर ताण वाढणार नाही याची दक्षता घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे. कोल्हापूरचे नागरिक अतिशय सुज्ञ असून ते या आवाहनाला प्रतिसाद देतील.
पाण्याखाली जाणारे महावितरणचे ‘डीपी’ सील होणार : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, गतवर्षीपासून पूरपरिस्थितीत पाण्याखाली जाणारे महावितरणचे ‘डीपी’ सीलबंद करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ते पाण्यात जरी केले तर त्यात पाणी जात नाही. पाणी ओसरल्यावर जुजबी दुरुस्ती करुन लगेच ते सुरु करता येतात. जे सबस्टेशनमधील पावर ट्रान्स्फरमेशनसाठी पर्यायी पावर ट्रान्स्फरमेशन मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहेत. ते जिह्यात सर्व तालुक्याच्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत.