आमदार सुरेश खाडेंनी घेतली कर्नाटक उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांची भेट
प्रतिनिधी / मिरज
पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य महापूराच्या धोक्यापासून सुटका करावयाची झाल्यास ‘आलमट्टी’वर नियंत्रण काळाची गरज आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्र-कर्नाटक शासनाच्या समन्वयातून हा प्रश्न निश्चित मार्गी लावू, अशी हमी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी दिली. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी सकाळी अथणी येथे त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी संभाव्य महापूराबाबत कर्नाटक शासनाकडून सकारात्मक पाऊले उचलली जातील, अशीही हमी दिली असल्याची माहिती आमदार खाडे यांनी पत्रकारांना दिली.
कोरोनाचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. यामुळे या भागातील अर्थकारण कोलमडले आहे. अशातच महापूराचा फटका बसला तरी या भागातील जनजीवन विस्कळीत होईल. त्यामुळे संभाव्य महापूर टाळण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयूरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे. आज आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी कर्नाटक उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांची भेट घेऊन समन्वयक तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. त्यांच्यासमवेत भाजपाचे अनुसुचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे, ऍड. विलास कौलगौड, सुहास कौलगौड, सागर वडगावे, विनायक बागडी उपस्थित होते.








