15 दिवस उलटूनही गोळय़ांची प्रतीक्षाच : प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणार गोळय़ा
प्रतिनिधी / ओरोस:
पालकमंत्री उदय सामंत यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱया अर्सेनिक अल्बम 30 या गोळय़ा घराघरात देणार असल्याचे जाहीर करून 15 दिवस लोटले तरी त्या अद्याप न दिल्याने जिल्हावासियांना या गोळय़ांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. कोरोनाचा विळखा जिल्हय़ात घट्ट होत असल्याचे चित्र असून रुग्ण संख्या 100 च्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे या गोळय़ा लावकरात लवकर वितरीत करण्यात याव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाची साथ रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. ही साथ रोखण्यात नागरिकांच्या सहकार्यामुळे चांगलेच यश येत असतानाच जिल्हय़ाबाहेरील नागरिकही मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. जिल्हय़ातील शाळा, कॉलेज, खासगी रिकामी घरे यासह सर्वच विलगीकरण केंदे हाऊसफुल्ल झाली. त्यानंतर काहींना वाडी वस्त्यांवर गृह अलगिकरणात ठेवण्यात आले. या परिस्थितीनंतर सुरुवातीपासून नियंत्रणात असलेली सिंधुदुर्गातील कोरोनाची साथ हळुहळू जिल्हय़ात पसरली.
कोरोना या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण जिल्हय़ात अर्सेनिक आल्बम 30 या रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱया गोळय़ा गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत घरपोच करण्यात येणार आहेत. असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पंधरा दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये जाहीर केले होते. मात्र, या गोळय़ा अद्यापही गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. कोरोना या साथीचा प्रतिकार करता यावा, नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी अर्सेनिक अल्बम 30 या गोळय़ा फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या गोळय़ा जनतेपर्यंत वेळेत पोहोचविणे आवश्यक होते. मात्र, याबाबत दिरंगाई होताना दिसत आहे. पालकमंत्र्यांनी जाहीर केलेले आर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱया गोळय़ांचे वाटप केव्हा होणार? असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आजपर्यंत मिळालेल्या एकूण 89 रुग्णापैकी 8 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर 81 रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, या रुग्णांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गरम पाण्यासारख्या आवश्यक सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या जात नाहीत. अशा तक्रारी संबंधित रुग्णांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे उपचारापेक्षा गैरसोय अधिक अशी स्थिती जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळत आहे. याकडे जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री लक्ष देतील का? अशी विचारणा रुग्णांकडून केली जात आहे









