पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाजपच्या बैठकीत घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या भयामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले जाणार नाही, अशी स्पष्ट घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते मंगळवारी येथे आयोजित भाजपच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला पक्षाचे खासदार उपस्थित होते. मोदींनी त्यांना अनेक महत्वाच्या सूचना केल्या.
देश कोरोनाच्या छायेत असताना खासदारांनी त्यांचे कर्तव्य पार पडले पाहिजे. संसदेतचे कामकाज पूर्णवेळ चालणार असून खासदारांनी त्यात सहभाग घेणे अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुयोग्यरित्या पार पाडणे हे खासदारांचे कर्तव्य आहे. अधिवेशनानंतर त्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन कोरोना संकटासंबंधी जनतेचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आरोग्यमंत्र्यांचे राज्यसभेत निवेदन
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज आहे. सध्या देशात 52 स्थानांवर चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. चाचणी केंद्रे नजीकच्या भविष्यात वाढविली जातील. सध्या देशात बाधित रूग्णांची संख्या 115 आहे. त्यातील काहीजण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारांच्या सहकार्याने केंद्र सरकार आवश्यक ती सर्व उपाययोजना करीत आहे. विदेशातील बहुतेक भारतीयांना परत आणण्यात आले आहे. त्यांची कसून चाचणी घेण्यात येत आहे. सध्या स्थिती नियंत्रणात आहे, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी राज्यसभेत केले. काँगेसचे आनंद शर्मा यांनी सरकारच्या तयारीविषयी त्यांना प्रश्न विचारले. त्याची समर्पक उत्तरे त्यांनी दिली.