रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची सरकारला सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासंबंधी अनेकांनी केंद्र सरकारला विविध सूचना केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेतील सहा त्रुटींची एक सूची केली असून या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात यावा, असे प्रतिपादन केले आहे.
सध्या राजन हे शिकागो येथील बूथ स्कूल ऑफ बिझनेस येथे प्राध्यापक आहेत. अर्थव्यवस्थेत जशी झगमगती स्थाने असतात तसे काही काळे डागही असतात. हे डाग पुसून टाकणे हे अर्थमंत्र्यांचे कौशल्य असते. सध्या मध्यमवर्ग आणि छोटे आणि मध्यम उद्योग यांची स्थिती बिकट असल्याचे जाणवते. मात्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, स्टार्टअप कंपन्या, युनिकॉर्न कंपन्या, तसेच वित्त क्षेत्रातील काही भाग सध्या अतिशय बळकट अवस्थेत आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
सहा त्रुटी
1. छोटे, मध्यम उद्योग, बेरोजगारी ः सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे हा दर सातत्याने वाढत आहे. निम्न मध्यमवर्गाची खर्च करण्याची क्षमता कमी झाली आहे. छोटे आणि मध्यम उद्योगांवर तसेच सरकारी उद्योगांवर दबाव आहे. मुलांचे शिक्षणही या त्रुटींमध्ये समाविष्ट आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
2. बाजारात मागणी घटल्याने कर्जाची उचल कमी झाली आहे. सरकारला कर्जाच्या मागणीत वाढ करण्यासाठी धाडसी पावले उचलावी लागतील. त्याशिवाय आर्थिक विकासाचा दर मोठय़ा प्रमाणात वाढणार नाही, असे ते म्हणतात.
3. ओमिक्रॉन हा अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था या दोन्हींसाठी धक्का आहे. ओमिक्रॉन कमी करणे आणि अर्थव्यवस्थेची गती वाढविणे हे उपाय करावेत.
4. 10 वर्षांची योजना आवश्यक ः सध्याच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी 10 वर्षांची दीर्घकालीन योजना आखणे आवश्यक आहे. किमान पाच वर्षांची योजना तरी असावीच, असे प्रतिपादन रघुराम राजन यांनी केले आहे.
5. आवश्यकता असेल तरच खर्च ः कोरोना येण्यापूर्वीही आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे आता अर्थमंत्री मोकळय़ा हातांनी खर्च करू शकत नाहीत. जिथे आवश्यकता आहे, तेथेच खर्च करणे आवश्यक आहे. वित्तीय तूट अधिक प्रमाणात वाढू नये यासाठी खर्च जपून करा, अशी सूचना त्यांनी केली.
6. आज जगातील सर्व देशांमध्ये महागाईचा मुद्दा महत्वाचा ठरत आहे. भारतही अपवाद असू शकणार नाही. त्यामुळे महागाई असहय़ न होईल अशी व्यवस्था अर्थसंकल्पात करणे अर्थमंत्र्यांसाठी आव्हानात्मक पण आवश्यक आहे, अशा सूचना रघुराम राजन यांनी करताना अर्थसंकल्प समतोल असेल अशी अपेक्षा व्यक्त केली.









