वृत्तसंस्था/ गोवानिया
लायोनेल मेसीच्या चमकदार कामगिरीच्या आधारे अर्जेन्टिनाने इक्वेडोरचा 3-0 असा पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मेसीने एक गोल नोंदवला आणि दोन गोलसाठी संधी निर्माण करून दिल्या. आता 7 जुलै रोजी पहाटे अर्जेन्टिना व कोलंबिया यांच्यात दुसरी उपांत्य लढत होईल. त्याआधी 6 जुलै रोजी पहाटे पहिली उपांत्य लढत यजमान ब्राझील व पेरू यांच्यात होणार आहे.
मेसीने रॉड्रिगो डी पॉल व लॉटेरो मार्टिनेझ यांना गोल नोंदवण्यासाठी चेंडू पुरविले आणि इंज्युरी टाईममध्ये वैयक्तिक गोल नोंदवून या सामन्यात शानदार प्रदर्शन केले. स्कोअरवरून हा सामना एकतर्फी झाल्यासारखे वाटत असले तरी इक्वेडोरने अर्जेन्टिनाला जोरदार टक्कर दिली. याशिवाय इंज्युरी टाईममध्ये पेड्रो हिकॅपीला बाहेर घालविल्याने त्यांना दहा खेळाडूनिशीच खेळावे लागले. अर्जेन्टिनाने प्रारंभालाच गोलची संधी निर्माण केली. मार्टिनेझने प्रथम गोलरक्षक हर्नान गॅलिन्डेझच्या वरून फटका मारला आणि नंतर गोलच्या दिशेने मारलेली व्हॉली रॉबर्ट अर्बोलडीयाने लाईनवरच ब्लॉक केल्याने ही संधीही वाया गेली. काही क्षणानंतर मार्टिनेझने मारलेल्या फटका इक्वेडोरच्या खेळाडूने डिफ्लेक्ट केल्याने वाईड गेला. त्यावर अर्जेन्टिनाला मिळालेल्या कॉर्नरवर जर्मन पेझेलाने गोलजाळय़ाच्या बाहेर फटका मारला. कार्लोस ग्रुएझोने अर्जेन्टिनाला जवळपास गोल बहालच केला होता. त्याने मारलेल्या बॅकपासवर मेसीने ताबा मिळवित जोरदार फटका मारला. पण तो बारला लागून परतला. मध्यंतरास पाच मिनिटे असताना मेसीने गोन्झालेझकडे चेंडू पुरविला. पण गोलरक्षक गॅलिन्डेझने टॅकल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मेसीने चपळता दाखवित तो चेंडू डी पॉलकडे दिला. त्यावर त्याने अचूक गोल केला. सामना संपण्यास सहा मिनिटे असताना मेसीने पुरविलेल्या पासवर मार्टिनेझने अर्जेन्टिनाचा दुसरा गोल नोंदवला. इंज्युरी टाईममध्ये इक्वेडोच्या हिकॅपीला डी मारियाला पाडवल्याबद्दर रेड कार्ड मिळाले. त्यावर मिळालेल्या फ्री किकवर मेसीने गोल नोंदवत अर्जेन्टिनाच्या विजय साकार केला.









