पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सवर 4-3 फरकाने मात, गोलरक्षक मार्टिनेझ ठरला विजयाचा हिरो
वृत्तसंस्था/ लुसैल
लायोनेल मेस्सीची विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची स्वप्नपूर्ती होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून अर्जेन्टिनाने येथे झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने शूटआऊटमध्ये दोन पेनल्टी थोपविल्या.
पेनल्टी शूटआऊटमध्ये मेस्सीने गोल नोंदवला तर मार्टिनेझने नेदरलँड्सच्या दोन पेनल्टी अडविल्या. 30 मिनिटांच्या जादा वेळेत 2-2 अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. निर्धारित वेळेत मेस्सीने एक गोल नोंदवला तर दुसऱया गोलसाठी त्याने संधी निर्माण करून दिली. नेदरलँड्सने स्टॉपेज टाईममधील 11 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून बरोबरी साधली. येत्या मंगळवारी अर्जेन्टिनाची उपांत्य लढत ब्राझीलला हरविणाऱया क्रोएशियाविरुद्ध होईल. 1990 नंतर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची अर्जेन्टिनाची ही दुसरी वेळ आहे. 2014 मध्ये अर्जेन्टिनाने अंतिम फेरी गाठली होती. मेस्सीही त्या संघाचा सदस्य होता. पण त्यावेळी जर्मनीकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
यावेळी मात्र मेस्सीने जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली असून त्याचा एकंदर खेळ पाहता त्याचे जेतेपदाचे स्वप्न साकार होण्याची शक्यता वाटत आहे. लॉटेरो मार्टिनेझने पेनल्टीवर विजयी गोल नोंदवला तेव्हा त्याचे सर्व सहकारी त्याच्याकडे धाव घेत जल्लोष सुरू केला. पण मेस्सी त्याच्याकडे न जाता दूर उभा असणाऱया गोलरक्षक मार्टिनेझकडे धाव घेत उडी मारून त्याला आलिंगन दिले.
निर्धारित वेळेत 35 व्या मिनिटाला नेहुएल मोलिनाने अर्जेन्टनाचा पहिला गोल नोंदवला ते मेस्सीच्या अप्रतिम खेळामुळेच. त्याने शानदार खेळ करीत ही संधी निर्माण करून दिली होती. त्यानंतर 73 व्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टीवर गोल नोंदवून ही आघाडी 2-0 अशी केली. या स्पर्धेतील त्याचा हा चौथा गोल असून विश्वचषकात त्याचे एकूण 10 गोल झाले आहेत. अर्जेन्टिनातर्फे विश्वचषकात सर्वाधिक 10 गोल नोंदवणाऱया गॅब्रियल बॅटिस्टुटाशी त्याने बरोबरी साधली आहे. याशिवाय 169 आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्याचा हा 94 वा गोल होता. 1966 नंतर मेस्सी वर्ल्ड कपमध्ये 17 गोलशी निगडित झाला असून यापैकी 7 गोल नोंदवण्यास त्याने मदत केली. याबाबतीत त्याने दिएगा माराडोना (एकूण 16 गोल) यांना मागे टाकले आहे. याशिवाय वर्ल्ड कपच्या बाद फेरीत त्याने पाच गोलसाठी असिस्ट केले असून महान खेळाडू पेले (4 गोल) यांना त्याने मागे टाकत नवा विक्रम केला आहे.
दुसऱया सत्रातील स्टॉपेज टाईममधील अखेरच्या टप्प्यात 78 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या वाऊट वेगहॉर्स्टने पाचच मिनिटांनंतर गोल नोंदवत अर्जेन्टिनाची आघाडी 2-1 अशी कमी केली होती. कूपमीनर्सने कर्लिंग फ्री किकवर मारलेला चेंडू एरियात पडला. पण त्याने अर्जेन्टाईन डिफेंडर्सला चकमा दिला. वेगहॉर्स्टने त्यावर ताबा घेत मार्करला हुलकावणी दिली आणि जोरदार फटका मारत चेंडूला जाळय़ाची दिशा देत पहिला गोल नोंदवला. वेगहॉर्स्टनेच स्टॉपेज टाईममधील 11 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली.
या सामन्यात एकूण 17 यलो कार्ड्स मिळाले, त्यात मेस्सीचाही समावेश आहे. त्याच्या वरच्या ओठातून रक्त येत असल्याचे एकदा दिसून आले. इन्झो फर्नांडिसने जादा वेळेतील खेळात मारलेला फटका बारला लागून बाहेर गेला होता. पेनल्टी शूटआऊटमध्येही त्याचा फटका हुकला होता. नेदरलँड्सच्या पराभवामुळे प्रशिक्षक 71 वर्षीय लुईस व्हान गाल यांचा करारही संपुष्टात आला. तिसऱयांदा ते या संघाचे प्रशिक्षक झाले होते.
मागील विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाने गट साखळी फेरीत अर्जेन्टिनाला 3-0 असे हरविले होते तर अर्जेन्टिनाने 1998 मधील स्पर्धेत क्रोएशियावर एकमेव गोलने मात केली होती.









