वृत्तसंस्था/ ऍसनसिऑन
2022 साली होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या सध्या सुरू असलेल्या पात्र फेरी स्पर्धेमध्ये अर्जेंटिनाने आतापर्यंत एकही सामना गमविलेला नाही. दरम्यान गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात पराग्वेने अर्जेंटिनाला गोलशून्य बरोबरीत रोखले.
जून 2019 नंतर अर्जेंटिना संघाला या पहिल्याच सामन्यात गोल नोंदविता आलेला नाही. प्रशिक्षक स्केलोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाने अलीकडच्या कालावधीत झालेल्या 23 सामन्यात एकही पराभव पत्करलेला नाही. विश्व करंडक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ दक्षिण अमेरिकन गटातून 19 गुणासह दुसऱया स्थानावर आहे. ब्राझीलचा संघ पहिल्या स्थानावर आहे. ब्राझीलने 27 गुण घेत पहिले स्थान मजबूत केले आहे. कॅरेकेस येथे झालेल्या पात्र फेरीच्या अन्य एका सामन्यात ब्राझीलने व्हेनेझुएलाचा 3-1 असा पराभव केला. 2022 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कतारमध्ये घेतली जाणार असून दक्षिण अमेरिकन गटातील पहिल्या चार संघांना थेट प्रवेश देण्यात येईल. अर्जेंटिना संघाचा पात्र फेरीतील पुढील सामना 10 ऑक्टोबरला उरुग्वे बरोबर तर 14 ऑक्टोबरला पेरुबरोबर होणार आहे.









