मंडळातर्फे नामांकन होण्याची शक्यता, एकापेक्षा अधिक नावांचा विचार झाल्यास शिखर धवनलाही संधी शक्य : लवकरच शिक्कामोर्तब होण्याचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराहची यंदा प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली जाणे अपेक्षित आहे. गतवर्षी देखील बुमराह यासाठी स्पर्धेत होता. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किमान 3 वर्षांपासून खेळत असण्याच्या निकषात तो बसत नव्हता. यंदा ती कसर भरुन निघत असल्याने त्याची शिफारस होण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षी रवींद्र जडेजाला हा पुरस्कार लाभला होता.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या महिन्याच्या दुसऱया टप्प्यात नामांकनाबाबत अंतिम निर्णय घेईल, असे संकेत आहेत. बुमराहने मागील चार वर्षात सातत्याने भेदक गोलंदाजी साकारली असून यामुळे त्याची एकमताने शिफारस केली जाईल, असाही होरा आहे. 26 वर्षीय बुमराहने 14 कसोटीत 68, 64 वनडेत 104 व 50 टी-20 सामन्यात 59 बळी घेतले आहेत.
पुरुष गटातून एकापेक्षा अधिक नामांकने पाठवण्याचा निर्णय झाल्यास बुमराहसह अनुभवी सलामीवीर शिखर धवनचा देखील विचार होऊ शकतो. यापूर्वी 2018 मध्ये धवनची संधी हुकली होती. त्यावेळी मंडळाने शिफारस केल्यानंतर देखील त्याला पुरस्कार लाभला नव्हता. गतवर्षी मंडळाने बुमराह, रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांची शिफारस केली होती.
‘बुमराहने सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तो आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी राहिला होता. शिवाय, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व विंडीजमध्ये डावात 5 बळी घेणारा तो एकमेव आशियाई गोलंदाज आहे’, असे सूत्राने सांगितले.
धवनसाठी त्याचा अनुभव ही जमेची बाजू ठरु शकते. विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व जडेजा या त्याच्यापेक्षा अनुभवी खेळाडूंना यापूर्वीच हा पुरस्कार लाभला असल्याने धवनसाठी ही उजवी बाजू आहे. मात्र, वर्षभराच्या कालावधीत तो काही वेळा दुखापतीमुळे संघाबाहेर होता, इतकीच अडचण असणार आहे. ‘आम्ही 2018 मध्ये धवनची शिफारस केली होती. पण, फक्त स्मृती मानधनालाच पुरस्कार मिळाला’, असे सूत्राने येथे नमूद केले.
शमीची शिफारस होणे कठीण
यंदा शमीविरुद्ध तक्रार नोंद झाली असल्याने त्याची शिफारस केली जाणार नाही, हे जवळपास निश्चित मानले जाते. शमीपासून विभक्त राहणाऱया त्याच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
– / सामने / बळी / सर्वोत्तम / सरासरी / इकॉनॉमी
कसोटी / 14 / 68 / 6-27/ 20.33 / 2.69
वनडे / 64 / 104 / 5-27 / 24.43 / 4.55
टी-20 / 50 / 59 / 3-11 / 20.55 / 6.66
प्रथमश्रेणी / 40 / 157 / 6-27 / 23.17 / 2.69









