मराठी अँकर म्हणजे बातम्यांचा टँकर. कवी असतो तर ही यमके घेऊन कविता ठोकली असती. पण ते शक्मय नाही.
टीव्ही आल्यावर सिनेमे बंद पडतील, वर्तमानपत्रे बंद पडतील अशी अनेकांनी भाकिते केली होती. पण तसे झाले नाही. कारण सिनेमात आणि वर्तमानपत्रात जे असतं ते टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आणि बातम्यांमध्ये नसतं. सिनेमात थोडा वेडेपणा असतो, पण तो अडीच-तीन तासात आटोपतो आणि म्हणून सुसह्य असतो. मालिकेत जे असतं ते सहन होत नाही. तीच बाब वर्तमानपत्रांची. त्यात एक बातमी एकदाच वाचावी लागते. फार फार त्या बातमीवर एखादा अग्रलेख किंवा वाचकांची दोन-चार पत्रं छापून येतात. पण टीव्हीवरची एकच बातमी रोज किमान डझन वेळा आणि अँकर नावाच्या महान प्राण्याच्या मनात आलं तर आठदहा दिवस ऐकावी-बघावी लागते.
गेल्या काही दिवसात किती चांगल्या-वाईट घटना घडून गेल्या. एका प्रांतातल्या हुशार मुलीला 98 टक्के मार्क पडले. तिला संशोधनासाठी काही कोटी रुपयांची शिष्यवृत्ती लाभली. घरच्यांना किती आनंद वाटला असेल. पण काही गुंडांनी तिचा पाठलाग केला. तो चुकवताना तिला अपघात होऊन तिचं निधन झालं. दुसऱया एका प्रांतात एका महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल पावसाने पडला. कोरोनावर मात करण्यासाठी आर्सेनिक आल्बम आणि भाभीजी का पापड खायला सांगणारी थोर माणसं स्वतःच कोरोनाग्रस्त झाली. आणखीन एका प्रांतात कोरोना तपासणी केंद्राचं उद्घाटन करायला गेलेल्या मंत्र्यानी उद्घाटन केलं आणि तिथेच तपासणी केली तर त्यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. सोशल मीडियावर एक बातमी दिसली की एका ठिकाणी नवा पूल बांधलेला होता. मंत्रीमहोदय त्याचं उद्घाटन करायला जाण्याच्या आधीच तो पडला आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा खर्च वाचला. एका प्रांतात कोरोना उपचार चालू असलेल्या रुग्णालयाला आग लागली. रशियाच्या अध्यक्षांनी कोरोनावर लस तयार झाल्याची घोषणा केली. एका प्रसिद्ध शायराचं निधन झालं. अमेरिकेत एका पक्षाने भारतीय वंशाच्या महिलेला उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. आपल्या सरकारने चीनची जोरदार नाकेबंदी केली. आपले अन्नदाते असलेले हजारो शेतकरी कर्जबाजारी होऊन अनेकदा आत्महत्या करीत असतात. पण त्या सर्व बातम्यांपेक्षा परवा निधन झालेल्या कोटय़ाधीश नटाचे निधन झाले, की आत्महत्या की खून हा तूर्त अँकर लोकांना पडलेला मोठ्ठा प्रश्न आहे.








