ऑनलाईन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला न्यायालयाने नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला आहे. गवळीने पॅरोल वाढवून देण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. मात्र, नागपूर खंडपीठाने त्याच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार दिला.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी गवळी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, पत्नीच्या गंभीर आजारपणामुळे तो 45 दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर आला होता. 27 एप्रिलला त्याने कारागृहात हजर राहणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे त्याची पॅरोल 10 मे पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतरही न्यायालयाने गवळीच्या मागणीनुसार त्याला 24 मे पर्यंत मुदतवाढ दिली. आता आणखी मुदतवाढीची मागणी गवळीने केली आहे. मात्र, नागपूर खंडपीठाने त्याला नकार दिला आहे.
गवळीने पॅरोल वाढवून देण्यासाठी कोणतंही गैरकृत्य तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचे उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.









