खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत गद्दारी मनोवृत्तीला चोख उत्तर देण्याचा निर्णय : स्वार्थ साधणाऱया माजी आमदाराच्या निषेधाचा ठराव
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक जनतेने 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठय़ा विश्वासाने तन, मन, धन अर्पण करून अरविंद पाटील यांना विजयी केले. पण त्या अरविंद पाटलांनी आता भाजप पक्षात प्रवेश करून सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. स्वतःचा स्वार्थ साधणाऱया माजी आमदार अरविंद पाटलांचा तीव्र निषेध करणारा ठराव मंगळवारी शिवस्मारकात झालेल्या तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील होते.
यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, वास्तविक 2008 मध्ये विधानसभा निवडणुकीतही माजी आमदार अरविंद पाटील यांनी म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली होती. पण हे सर्व विसरून 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मराठी भाषिक जनतेने मोठय़ा विश्वासाने निवडून दिले. त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करून मराठी भाषिकांशी गद्दारी केली आहे. अशा गद्दारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आम्ही विधानसभेची उमेदवारी देऊन निवडून आणले. याबद्दल मी स्वतः खानापूर तालुक्यातील जनतेची म. ए. समितीच्यावतीने जाहीर माफी मागत आहे. आता यापुढे म. ए. समितीची संघटना अधिक भक्कम करून अशा गद्दारी प्रवृत्तीच्या माजी आमदाराला पुन्हा त्यांची जागा दाखवूया, असे मत व्यक्त केले.
यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीच्या दोन्ही गटांत लवकरात लवकर ऐक्य व्हावे, यासाठी त्रिसदस्य कमिटीची नियुक्ती करून येत्या 10 मार्चपर्यंत ऐक्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी नेमलेल्या त्रिसदस्य समितीवर सरचिटणीस आबासाहेब दळवी, डी. एम. भोसले तसेच शिवाजी सहदेव पाटील यांची निवड करण्याचाही निर्णय घेण्यात आला. येत्या 14 मार्च रोजी म. ए. समितीची व्यापक बैठक बोलावून गावागावात संघटना मजबूत करण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, शामराव पाटील, अर्जुन देसाई, रुक्माण्णा झुंजवाडकर, नारायण कापोलकर, परशराम पाटील, मुरलीधर पाटील, विशाल पाटील, यशवंत बिरजे, महादेव घाडी, विवेक गिरी यांची भाषणे झाली. यावेळी म. ए. समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली. बैठकीला देवाप्पा भोसले, डॉ. एल. एस. पाटील, फकिरा सावंत, शिवाजी पाटील, विठ्ठल गुरव, नारायण लाड, मऱयाप्पा पाटील, कल्लाप्पा पाटील, बी. बी. पाटील यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









