ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे छोटा मोदी असल्याची टीका काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. अरविंद केजरीवाल सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गोवामध्ये आहेत.सुरजेवालाही गोवामध्ये आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांना गोव्यात आलेले तोतया असा उल्लेख करत भाजपाला मदत करत असल्याचा आरोप केला. तसेच पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “आप सरकार कुठे आहे? अरविंद केजरीवाल दुसरे तिसरे कोणी नसून छोटे मोदी आहेत”. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सुरजेवाला यांनी केजरीवालांसोबत असणारे योगेंद्र यादव, कुमार विश्वास, प्रशांत भूषण आता त्यांच्यासोबत का नाहीत? अशी विचारणा करताना ते म्हणाले की, “अरविंद केजरीवाल यांची वागणूक, विचार, हुकूमशाहीच सर्व काही सांगून जाते”. यावरुनच तुम्हाला या तोतया व्यक्तीचं चारित्र्य कसं आहे लक्षात येतं असं ते प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
सुरजेवाला म्हणाले की, “दिल्लीमधील काँग्रेस सरकार आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या शिला दिक्षित यांना आपने लोकपाल आणण्याचं आश्वासन दिल्याने जनतेने नाकारलं होतं. ते दोन वेळा मुख्यमंत्री राहिले, पण लोकपाल कुठे आहे? त्यांना पारदर्शकता आणि प्रामाणिकतेची शपथ घेतली होती. पण ते कुठं आहे?”. असा सवालही त्यांनी यावेळी केला.
“मला गोव्यातील नागरिकांना सांगायचं आहे की, तोतया लोक इथे आले आहेत आणि ते भाजपाची बी-टीम आहे. ते फक्त भाजपाची मदत करण्यासाठी आहेत. भाजपाला झळ पोहोचू नये यासाठी ते मदत करत आहेत. त्यामुळेच या सफेद रंगाची टोपी घातलेल्या पण आतून आरएसएसचा रंग असणाऱ्या तोतयांपासून सावधान राहण्याची गरज आहे,” अशी टीका सुरजेवाला यांनी केली.