मुंबई \ ऑनलाईन टीम
दक्षिण अरबी समुद्रात 15 मेच्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम सरकण्याची शक्यता आहे. 14 मे रात्रीपासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी सूचना दिल्याची माहिती हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
चक्रीवादळ टाँकटाई (Tauktae) लक्षद्वीपच्या दक्षिणेस तयार होईल आणि केरळच्या किनारपट्टीजवळ येण्याचा अंदाज आहे. यामुळे 14 आणि 15 मे दरम्यान केरळ आणि कर्नाटका राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या काही दिवसांत चक्रीवादळ टाँकटाई अधिक तीव्र होईल, असा जागतिक अंदाज वर्तवित आहेत. काही हवामान मॉडेल्सनुसार ओमान किंवा पाकिस्तानच्या दिशेने हे वादळ प्रवास करणार आहे. युरोपियन एन्सेम्बल प्रिडिक्शन सिस्टमचा अंदाज आहे की हे चक्रीवादळ 17 मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.
यासोबतच यावर्शी मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार आहे. 1 जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने यापूर्वी वर्तवली आहे. दरम्यान 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.