गुजरात किनाऱयानजीक सुरू केले सागरी सर्वेक्षण
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
दक्षिण चीन समुद्रावर कब्जा करू पाहणाऱया चीनने आता स्वतःची वक्रदृष्ठी अरबी समुद्राकडे वळविली आहे. अरबी समुद्रात चीनला पाकिस्तान मदत करत आहे. चीन आणि पाकिस्तानने अरबी समुद्रात भारताच्या गुजरात किनाऱयानजीक सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. कराची बंदरानजीक अरबी समुद्रात मुंबई हायप्रमाणे नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा मोठा साठा सापडण्याची अपेक्षा पाकिस्तानला आहे.
भूकंप संबंधी संशोधन आणि कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी चीन-पाकिस्तानने अरबी समुद्रात शोधकार्य हाती घेतले आहे. चीन आणि पाकिस्तानने 2019 मध्ये अशाच प्रकारचा प्रकल्प हाती घेतला होता. सागरातील हे सर्वेक्षण चीनचे अत्याधुनिक जहाज हाययांग डिझीकडून केले जातेय.
2019 मध्येही याच जहाजाने सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षण पथकात दोन्ही देशांचे वैज्ञानिक सामील आहेत. हे जहाज समुद्रात ड्रिल करण्यास सक्षम आहे. तसेच ते 8 हजार सागरी मैलापर्यंत सर्वेक्षण करू शकते. 75 मीटर लांब आणि 15 मीटर रुंदीचे हे जहाज चीनच्या सर्वात आधुनिक शोध जहाजांपैकी एक आहे.
या सर्वेक्षण जहाजाच्या मदतीने चीन समुद्रातील नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या साठय़ाचा शोध लावू शकतो. पाक सरकारने कराचीनजीक तेल-वायूचा साठा शोधण्यासाठी शक्तिनिशी प्रयत्न चालविले आहेत. पाकिस्तान इराणच्या किनाऱयानजीक देखील मोठय़ा प्रमाणावर ड्रिलिंग करतोय पण त्याला यश मिळाले नाही.









