आंतरधर्मीय प्रेमाला विरोधातून सुपारी देऊन खून, दांपत्यासह दहा जणांना अटक : विशेष पोलीस पथकाने केला तपास
प्रतिनिधी /बेळगाव

आझमनगर येथील अरबाज महंमद मुल्ला (वय 24) या तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी दहा जणांना अटक करण्यात आली असून आंतरधर्मीय प्रेमप्रकरणाला असलेल्या विरोधामुळे सुपारी देऊन अरबाजचा काटा काढण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.
28 सप्टेंबर रोजी अरबाजचा भीषण खून झाला होता. खुनानंतर त्याचे हातपाय बांधून मृतदेह खानापूर रेल्वे पुलाजवळील रूळावर टाकण्यात आला होता. शिर धडावेगळे करून अत्यंत क्रूरपणे त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. 29 सप्टेंबर रोजी अरबाजची आई नजिमा यांनी येथील रेल्वे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
पुंडलिक ऊर्फ महाराज नागाप्पा मुतगेकर (वय 39), रा. ओतोळी-खानापूर, कुतबुद्दिन अल्लाबक्ष बेपारी (वय 36) रा. बाहेर गल्ली, खानापूर, सुशीला इराप्पा कुंभार (वय 42), तिचा पती इराप्पा बसवाणी कुंभार (वय 54) दोघेही राहणार मारुतीनगर, मारुती प्रल्हाद सुगते ऊर्फ गोंधळी (वय 30) रा. मरेम्मा कॉलनी, खानापूर, मंजुनाथ तुकाराम गोंधळी (वय 25), गणपती ज्ञानेश्वर सुगते ऊर्फ गोंधळी (वय 27) दोघेही रा. विद्यानगर खानापूर, प्रशांत कल्लाप्पा पाटील (वय 28) रा. चन्नेवाडी, ता. खानापूर, प्रवीण शंकर पुजेरी (वय 28) रा. बाळेकुंद्री खुर्द, श्रीधर महादेव डोणी (वय 31) रा. होनगा, ता. बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दहा जणांची नावे आहेत.
जिल्हा पोलीसप्रमुखांनी शुक्रवारी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 28 सप्टेंबर रोजी चर्चा करायची आहे म्हणून अरबाजला खानापूरला बोलावून रेल्वेरूळाजवळच निर्जन ठिकाणी त्याचा भीषण खून करण्यात आला आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वेरूळावर टाकण्यात आला. सुरुवातीला रेल्वे पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 4 ऑक्टोबर रोजी हे प्रकरण चौकशीसाठी खानापूर पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.
भादंवि 302, 201, सहकलम 34 बरोबरच 341, 120(बी), 384, 388, सहकलम 149 व भारतीय शस्त्रास्त्र कायदा कलम 27 अन्वये सर्व दहा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक नियुक्त करण्यात आले होते.
या पथकात बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी, नंदगडचे पोलीस निरीक्षक एस. बी. माळगोंडा, नंदगडचे पोलीस उपनिरीक्षक यु. एस. आवटी, खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ आदी अधिकाऱयांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्या सर्व दहा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
प्रेमप्रकरणाला विरोध होता म्हणून…
खून झालेला अरबाज याचे खानापूर येथील एका तरुणीशी प्रेमप्रकरण सुरू होते. या आंतरधर्मीय पेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. 26 सप्टेंबर रोजी अरबाज व त्याची आई नजीमा यांना खानापूरला बोलावून समेटासाठी बैठक आयोजिली होती. त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाला सक्त विरोध केला होता. त्यामुळे अरबाजच्या मोबाईलमधील फोटो डिलिट करून तेथेच त्याचे सीमकार्डही मोडून टाकले होते. त्यानंतर अरबाजने नवीन सीमकार्ड खरेदी केले होते. हा बदललेला क्रमांक अरबाजचे कुटुंबीय वगळता इतरांना कसा कळाला? हाही तपासाचा मुद्दा आहे. प्रेमप्रकरणाला विरोध होता म्हणून त्याचा सुपारी देऊन भीषण खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पुंडलिक ऊर्फ महाराज हा हिंदू संघटनेचा स्थानिक पदाधिकारी आहे.
कुतबुद्दीनेच बोलाविले
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 28 सप्टेंबर रोजी अरबाजला कुतबुद्दीन व त्याच्या आणखी एका मित्राने बोलावून घेतले. अरबाज पिरनवाडीपर्यंत गेल्यानंतर त्याला मारेकऱयांनी आपल्या कारमध्ये घेतले. तेथून खानापूर रेल्वेरूळाजवळ नेऊन त्याचा खून करण्यात आला. त्यामुळे कुतबुद्दीनलाही अटक झाली आहे.
सर्व बाजूंनी तपास : लक्ष्मण निंबरगी

अरबाज खून प्रकरणाचा छडा लावावा, गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी एमआयएमसह अनेक मुस्लीम संघटनांनी पोलीस दलाकडे मागणी केली होती. लढा उभारण्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, त्याआधीच पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ‘तरुण भारत’ने जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. प्रेमप्रकरण, त्याला तरुणीच्या कुटुंबीयांचा असलेला विरोध, समेटासाठी झालेली बैठक, आदींविषयी संपूर्ण माहिती जमविण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.









