रेल्वे पोलिसांकडून लवकरच वर्ग होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
चार दिवसांपूर्वी खानापूर येथील रेल्वेपूलाजवळ खून झालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या अरबाज मुल्ला (वय 24) या तरुणाच्या खून प्रकरणाचा तपास लवकरच जिल्हा पोलिसांकडे वर्ग होणार, अशी माहिती मिळाली आहे. सध्या रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासाअंती प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
अरबाज हा आपल्या कुटुंबियांसह सध्या अजमनगरला राहत होता. मंगळवार दि. 28 सप्टेंबर रोजी त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले असून दुसऱया दिवशी सकाळी खुनाचा प्रकार सामोरे आला. खानापूर येथील रेल्वे पूलाजवळ त्याच्या शरीराचे तुकडे आढळून आले. त्याचे हात-पाय बांधण्यात आले होते. आईने येथील रेल्वे पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या दिवसांपासून रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद अरेनाड व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनीही या प्रकरणाच्या तपासात जातीने लक्ष घातले आहे. शुक्रवार व शनिवारी दोन्ही दिवस त्यांनी स्वतः खानापूरला भेट देवून या प्रकरणासंबंधी माहिती मिळविली आहे.
उपलब्ध माहितीनुसार लवकरच हे प्रकरण तपासासाठी जिल्हा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. दरम्यान शनिवारी अरबाजची आई नजीमा यांनी काही माध्यमांसमोर गंभीर स्वरुपाचे आरोप केले असून आपल्या एकुलत्या एक मुलाचा अमानुष्यपणे खून करणाऱया खुन्यांचा शोध घेवून त्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अंतरजातीय प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे सुरूवातीलाच उघड झाले होते. रेल्वे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. अत्यंत नियोजनबध्दरित्या अरबाजचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आल्याचा संशय आहे. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वेरुळावर टाकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आणखी माहिती उघडकीस येणार असून या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळण्याची शक्मयता आहे.









