ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. राम मंदिरासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचे सपाटीकरण आणि खोदकाम करताना काही पुरातन मूर्ती, पुष्प कलश आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये देशात बांधकामांना परवानगी मिळाळू असून, अयोध्येतही श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे.मंदिराच्या खोदकामावेळी सापडलेल्या वस्तूंविषयी बोलताना चंपत राय म्हणाले, मागील दहा दिवसांपासून मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. यावेळी काही खोदकामही करण्यात आले. यावेळी पुरातन काळातील देवदेवतांच्या मुर्ती, नक्षीदार खांब, पुष्प कलश, शिवलिंग यासारख्या ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत.
मंदिराच्या सपाटीकरणाच्या कामात तीन जेसीबी, एक क्रेन, दोन ट्रॅक्टर आणि दहा मजूर काम करत आहेत. कोरोना संसर्गामुळे मंदिराचे बांधकाम धीम्या गतीने सुरू आहे. 11 मे पासून सुरू या कामाला सुरुवात झाली असून, देवी-देवतांच्या खंडित मूर्तींसारख्या मोठ्या प्रमाणात पुरातन वस्तू सापडत आहेत.









