ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येत भगवान श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती बनवण्याचे काम सुरू झाले आहे. 251 मीटर उंचीची ही मूर्ती असणार आहे. ही मूर्ती तयार करण्याचे काम देशातील सर्वश्रेष्ठ मूर्तिकार राम सुतार यांच्याकडे देण्यात आले आहे.
श्रीरामांची मूर्ती पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असावी, असा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रयत्न आहे. मूर्तिकार राम सुतार हे 94 वर्षांचे आहेत. त्यांचा मुलगा अनिल सुतार त्यांना या कामात मदत करणार आहे. ही मूर्ती पूर्णपणे स्वदेशी असेल आणि ती उत्तरप्रदेशातच तयार होईल, असे सुतार यांनी म्हटले आहे. मुुर्ती तयार करण्यासाठी साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे काम राम सुतार यांनीच केले आहे. तेथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 183 मीटरचा आहे. मूर्तिकार राम सुतार हे मूळचे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील आहेत. दिल्लीतील नोएडा येथे त्यांचे एक स्टुडिओ आहे. त्यांनी आतापर्यंत 15 हजारांपेक्षा अधिक मूर्ती बनविल्या आहेत.