ऑनलाईन टीम / लखनऊ :
अयोध्येच्या राम जन्मभूमी येथील चेकिंग पॉईंटवर तैनात आलेल्या सात महिला कॉन्स्टेबलची कोरोना लस घेतल्यामुळे प्रकृती बिघडली आहे. त्यांना शुक्रवारी कोरोना लस देण्यात आली होती. आज त्यांना अस्वस्थता आणि चक्कर येणे यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांना तेथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
राम जन्मभूमीच्या तीन तपासणी केंद्रांवर या महिला कॉन्स्टेबल्सची नियुक्ती करण्यात आली होती. अचानक त्यांना अस्वस्थता आणि चक्कर येऊ लागली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, घाबरण्यासारखं काहीही नाही. लस घेतल्यानंतरची ही सामान्य लक्षणे आहेत. सर्वांचा रक्तदाब सामान्य आहे, त्यांची तब्बेत आता ठीक आहे.
शुक्रवारी उत्तर प्रदेशात 84,109 आरोग्य सेविका आणि पहिल्या टप्प्यातील कामगारांना लस देण्यात आली. या राज्यात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 7,13,530 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.









