ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह आणि सपाचे नेते पवन पांडेय यांनी आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला आहे.
संजय सिंह यांनी म्हटले आहे की, राम मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने जमीन खरेदीत आर्थिक घोटाळा केला आहे. या ट्रस्टने 18 मार्च रोजी 18.5 कोटी रुपयांना सुलतान अन्सारी आणि रविमोहन तिवारी यांच्याकडून जमीन खरेदी केली. ही जमीन अन्सारी आणि तिवारी यांनी 5 मिनिटांपूर्वी हरीश पाठक व कुसुम पाठकांकडून 2 कोटी रुपयांत खरेदी केली होती. त्यामुळे पाच मिनिटांत या जमीनीची किंमत 16.5 कोटी रुपयांनी कशी वाढली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पांडेय म्हणाले, जमीन खरेदीच्या या दोन्ही व्यवहारात डॉ. अनिल मिश्रा साक्षीदार आहेत. पहिल्या खरेदीच्या रजिस्ट्रीचा ई-स्टॅम्प 5.11 वाजता खरेदी केला गेला. जेव्हा तिवारी यांनी ही जमीन हरीश पाठकांकडून खरेदी केली, त्याचा ई-स्टॅम्प 5.22 वाजता खरेदी केला गेला. जमीनीसाठी या ट्रस्टने 17 कोटींचे आरटीजीएस केले आहे. हे पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले, याचीही चौकशी व्हावी, अशीही मागणी पांडेय यांनी केली आहे.









