खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातून अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी समर्पित करण्याचा निर्णय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच विविध हिंदू संघटनांच्यावतीने करण्यात आला आहे. यासाठी ग्रामीण भागात गावपातळीवर तसेच शहरी भागात विभागवार बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी खानापूर येथील कडोलकर गल्लीमध्ये किरण यळळूरकर यांच्या संकुलात सुरू करण्यात आलेल्या समर्पण कार्यालयाचे उद्घाटन तालुक्यातील विविध मठाधीशांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प. पू. चन्नबसव देवरु रुद्रमस्वामी मठ अवरोळी, हंडीभडंगनाथ मठाचे प. पू. पीर मोहननाथजी महाराज, बाळेवाडी मठाचे प. पू. पीरयोगी मंगलानथजी महाराज, किरावळे मठाचे पीरयोगी गुलशननाथजी महाराज, पीरयोगी आझादनाथजी महाराज आग्रा उत्तरप्रदेश उपस्थित होते.
प्रारंभी सर्वज्ञ कपिलेश्वरी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तर यानंतर रवि नाईक व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच जयपाल गणाचारी आदींच्या हस्ते विविध देवदेवतांचे पूजन करण्यात आले. तसेच स्वामीजींच्या हस्ते गो-मातेचे पूजन करण्यात आले. यानंतर ऍड. सिद्धार्थ कपिलेश्वरी यांनी निधी समर्पण कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोलताना श्री श्री चन्नबसव देवरु म्हणाले, हिंदू धर्म जगातील एक सर्वश्रेष्ठ धर्म आहे. या धर्माचे आचार-विचार सर्वांनी आचरणात आणणे अत्यंत गरजेचे आहे. आयोध्येतील श्री राम मंदिर जगातील महान वास्तू ठरणार आहे. या कार्यासाठी देशातील प्रत्येक हिंदू धर्मीयांनी हातभार लावावा, असे आवाहन केले. तर जिल्हा प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणसाठी आजवर झालेल्या लढय़ांचा आढावा घेतला. शेवटी तालुका विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंद किरमटे यांनी सर्वांचे आभार मानले.
आता तालुक्यात निधी समर्पण कार्यासाठी गावागावात बैठका घेण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. येत्या दि. 16 जानेवारी रोजी संपूर्ण तालुक्यात एकाच दिवशी निधी संकलनाचे काम हाती घेतले जाणार आहे..









