200 फुट खोलीवर टाईम कॅप्सूल ठेवला जाणार : जन्मभूमीचे पुरावे सुरक्षित ठेवण्याचा उद्देश
अयोध्या/ वृत्तसंस्था
अयोध्येत राम मंदिराचा इतिहास हजारो वर्षांपर्यंत रहावा याकरता मंदिराच्या गर्भगृहाच्या 200 फूट खोलीवर टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे. यात मंदिराचा पूर्ण तपशील नमूद असणार आहे. भविष्यात जन्मभूमी आणि राम मंदिराचा इतिहास पाहता यावा आणि कुठलाच वाद होऊ नये याकरता हे पाऊल उचलण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी ही माहिती दिली आहे.
बिहारचे रहिवासी असणाऱया चौपाल यांनी 9 नोव्हेंबर 1989 रोजी अयोध्येत राम मंदिरासाठी कोनशिला ठेवली होती. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिर उभारणीच्या कार्याचा शुभारंभ करणार आहेत. तत्पूर्वी 3 ऑगस्टपासून वैदिक विधी सुरू होतील. 5 ऑगस्ट रोजीचा प्रस्तावित भूमिपूजन सोहळा दूरदर्शनवरून थेट प्रसारित केला जाणार आहे.
या कार्यक्रमानंतर मंदिराच्या निर्मितीस प्रारंभ होईल. 200 मीटर खोलीवरील मातीचे नमुने घेण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती मुख्य स्थापत्यकार निखिल सोमपुरा यांनी दिली आहे. एलअँडटी कंपनी पायाखोदाईचे काम सुरू करणार आहे. पाया किती खोल असावा याचा निर्णय अहवाल प्राप्त झाल्यावर घेतला जाईल. मंदिराचे व्यासपीठ 12 ते 15 फुटांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
टाईम कॅप्सूल
टाईम कॅप्सूल एका कंटेनरप्रमाणे असते आणि ते सर्व ऋतूंमध्येही टिकून राहू शकते. सर्वसाधारणपणे भविष्यात लोकांसोबत संवाद साधण्यासाठी याचा वापर केला जातो. टाईम कॅप्सूलमुळे पुरातत्वतज्ञ किंवा इतिहासकारांना अध्ययनात मदत मिळते. 30 नोव्हेंबर 2017 रोजी स्पेनच्या बर्गोसमध्ये सुमारे 400 वर्षे जुना टाईम कॅप्सूल आढळून आला होता. हा टाईम कॅप्सूल मूर्तीच्या रुपातील होता. त्यात सन 1,777 मधील आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक माहिती अंतर्भूत होती.









