प्रतिनिधी /बेळगाव
येथील अयोध्यानगरमधील डेनेज ब्लॉक झाल्याने डेनेज ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. ही समस्या तीन-चार महिन्यांपासून जैसे थे असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढलेली आहे.
अयोध्यानगर परिसरात अनेक हॉस्पिटल्स आहेत. हॉस्पिटल्सचे सांडपाणी डेनेजला जोडण्यात आले आहे. मात्र, येथील आयसीआयसीआय बँकेच्या कॉर्नरवर डेनेज ब्लॉक होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. याबाबत रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार करूनदेखील दुरुस्तीकडे कानाडोळा केल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत.
येथील डेनेजचे सांडपाणी गटारीला जोडण्यात येत होते. यावेळी परिसरातील नागरिकांमधून विरोध करण्यात आला. डेनेजचे सांडपाणी गटारीला जोडले गेले तर परिसरात दुर्गंधी पसरून जगणे मुश्कील होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. येथील डेनेजची लवकरात लवकर दुरुस्ती करावी आणि डेनेजचे कनेक्शन दुसऱया बाजूला द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.









