इमोशनल पोस्ट लिहित केली घोषणा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
चेन्नईचा स्टार फलंदाज अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. रायुडूने ट्वीट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. ‘मुंबई आणि चेन्नई या दोन संघाचा भाग होण्याची संधी मिळाली. 14 हंगाम, 203 सामने, 11 प्लेऑफ, 8 फायनल आणि पाच आयपीएल चषके… आज सहावा चषक जिंकू अशी आशा आहे. आज रात्री होणारा सामना माझ्या आयपीएल करिअरचा अखेरचा सामना असेल. सर्वांचे आभार’.. अशी इमोशनल पोस्ट रायुडूने केली आहे.

रायुडूच्या एकंदरीत आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आयपीएलमध्ये जास्त संघ बदलले नाहीत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या बलाढ्या संघांचा तो सदस्य राहिला आहे. रविवारी तो आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 203 वा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या 202 आयपीएल सामन्यांमध्ये 28.11 च्या सरासरीने त्याने एकूण 4329 धावा केल्या आहेत. 100 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. यादरम्यान त्याने एकूण 22 अर्धशतकेही ठोकली आहेत. रायुडूसाठी 2018 चा हंगमात सर्वोत्कृष्ट होता. या हंगामात त्याने 16 सामन्यात 602 धावांचा पाऊस पाडला होता. पण 2023 चा आयपीएल हंगाम रायुडूसाठी काही खास राहिला नाही. त्याने 15 सामन्यात फक्त 139 धावा केल्या. यंदाच्या हंगामात रायुडूला खास करुन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरण्यात आले.
रायुडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी 55 वनडे आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 1694 आणि 42 धावांचे योगदान दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला संधी मिळाली नाहीये. दरम्यान, सीएसकेने आतापर्यंत एकूण 4 आपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. संघ जर यावेळीही आयपीएल ट्रॉफी जिंकली, तर रायुडूसाठी हा सर्वोत्तम निरोप असेल.
निर्णयावरुन यु टर्न घेणार नाही
हा खूप मोठा प्रवास होता. आज होणारा आयपीएलचा अंतिम सामना हा माझा शेवटचा सामना असेल असा निर्णय मी घेतला आहे. मला या स्पर्धेत खेळताना खूप मजा आली. तुम्हा सर्वांचे आभार. आता कोणताही यु-टर्न नाही….
-अम्बाती रायुडू









