सेलिब्रिटी कलाकारांना कधी भूमिकेसाठी वजन वाढवावं लागतं तर कधी स्लीमट्रीम व्हावं लागतं. हा झाला कामासाठी घाम गाळण्याचा भाग. पण एरव्हीही कलाकारांना फिटनेसच्या बाबतीत तडजोड करून चालत नाही. अशा जिम लूकमधल्या कलाकारांना पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही आतूर असतात. असाच एक व्हिडिओ अभिनेता अमोल कोल्हे याने शेअर केला आहे. भला मोठा टायर उचलून ढकलण्याचा हा व्यायाम करताना अमोलला इतका घाम फुटला आहे की काही विचारू नका. तरीही ‘थकेगा नही साला’ हा पुष्पाफेम डायलॉग कॅप्शनमध्ये लिहित अमोलने त्याचे वर्कआऊट रिल पोस्ट केले आहे. अभिनेता, निर्माता, डॉक्टर, खासदार अशा अनेक भूमिका निभावणाऱया सेलिब्रिटी अमोल कोल्हे याचा हा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे.शिवाजी महाराजांची भूमिका म्हटली की अमोल कोल्हे हा अभिनेता डोळय़ासमोर येतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेलाही अमोलने न्याय दिला. ताराराणीच्या आयुष्यावर आधारीत मालिकेची निर्मितीही अमोलने केली आहे. चालता बोलता हा शो अमोल त्याच्या कारकीर्दीच्या सुरूवातीला होस्ट करत होता. ऑन डय़ुटी 24 तास या सिनेमात अमोलने पोलिसाची भूमिका केली होती. पण ऐतिहासिक भूमिका गाजवणारा अमोलची वकृत्वशैलीही अफलातून आहे.
संकलन – अनुराधा कदम









