नवी दिल्ली
अमेरिकेत नव्याने अधिकारावर आलेल्या बायडन प्रशासनाबरोबर भारताचे संबंध सुदृढ राहतील, अशी अपेक्षा परराष्ट्र व्यवहार विभागाने व्यक्त केली आहे. जागतिक आव्हानांचा विचार करता अमेरिकेशी जागतिक भागिदारी करण्यावर भारताचा भर असेल, असे विभागाने केलेल्या वक्तव्यात सांगण्यात आले आहे.
परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी अमेरिकेच्या नव्या प्रशासनाचे स्वागत करताना अध्यक्ष जोसेफ बायडन यांना त्यांच्या कार्यकाळासाठी सुयश चिंतिले. दोन्ही देश हातात हात घालून परस्पर संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने कार्यरत राहतील, असा आशावाद त्यांनी प्रगट केला.
गेल्या 20 वर्षात अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये उत्तरोत्तर अधिक बळकटी येत गेली आहे. अमेरिका किंवा भारतात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी हे संबंध अधिक दृढ झालेले आहेत. हीच प्रक्रिया बायडन प्रशासनाच्या कार्यकाळातही पुढे सुरू राहील. अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेसमोरील आव्हाने समान आहेत. त्यामुळे दोन्ही देश परस्पर सहकार्याने ती पार करण्याचा प्रयत्न करतील, असेही परराष्ट्र विभागाने वक्तव्यात म्हटले आहे.
बायडन प्रशासनाने 20 जानेवारीला कार्यभर हाती घेतला आहे. या प्रशासनाचे विदेश आणि सामरिक धोरण येत्या काही दिवसांमध्ये घोषित होण्याची शक्यता आहे.









