गुप्त मार्गाने विमानतळावर पोहोचत आहेत सैनिक
अफगाणिस्तानातून परतणारे अमेरिकेचे सैन्य आयएसआयएस-केच्या धोक्यामुळे काबूल विमानतळासाठी पर्यायी मार्ग तयार करत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी अफगाणिस्तानातील सुरक्षा स्थिती आणि इस्लामिक स्टेटच्या शाखेच्या विरोधातील मोहिमांवर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱयांसोबत बैठक घेतली आहे.
आयएसआयएस-केकडून विमानतळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हामिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेच्या नागरिकांना असलेल्या इस्लामिक स्टेटच्या धोक्याची जाणीव आहे. काबूल विमानतळ आणि त्याच्या गेटपर्यंत पोहोचणाऱया लोकांसाठी ‘पर्यायी मार्ग’ तयार करण्याच्या सैन्याच्या प्रयत्नांविषयी अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱयांनी अध्यक्षांना माहिती दिली आहे.
तालिबानला कल्पना
हे नवे मार्ग अमेरिकन नागरिक, अन्य देशांचे नागरिक आणि अफगाणींसाठी उपलब्ध असतील. नव्या मार्गासंबंधी तालिबानला देखील कल्पना आहे. पेंटागॉन विमानतळाच्या परिसरातील स्थितीवर नजर ठेवून आहे. विमानतळावरील वाढत्या गर्दीला इस्लामिक स्टेटकडून लक्ष्य केले जाऊ शकते. तसेच कारबॉम्ब किंवा आत्मघाती हल्लेखोरांचा वापर केला जाऊ शकतो अशी भीती अधिकाऱयाने व्यक्त केली आहे.
आमच्याकडे सुरक्षा विषयक चिंतांची एक पूर्ण यादी आहे. लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे सैन्याचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. लवकरात लवकर अधिकाधिक लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. हीच मोहीम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आम्ही सुरक्षा स्थितीची पूर्ण माहिती घेत आहोत असे पेंटागॉनचे माध्यम सचिव जॉन किर्बी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.









