इराण राष्ट्रपती हसन रुहानींचे विधान : निर्बंधांमुळे घायकुतीला
वृत्तसंस्था / तेहरान
कोरोना महामारीमुळे इराण संकटात असतानाही मित्रदेशांकडून मदत मिळू शकलेली नाही, असे उद्गार राष्ट्रपती हसन रुहानी यांनी काढले आहेत. राजधानी तेहरानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात रुहानी यांनी मित्र देशांनी सद्यकाळात अमेरिकेच्या निर्बंधांची तमा सोडून देत आमची साथ द्यावी, अमेरिकेने थोडीतरी माणुसकी दाखवायला हवी होती असे म्हटले आहे.
इराणमध्ये आतापर्यंत 3 लाख 80 हजारांहून अधिक रुग्ण सापडले असून 22 हजारांहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. इराण आणि अमेरिकेदरम्यान 2015 मध्ये करार झाला होता, जो दोन वर्षांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने मोडीत काढला आहे. तसेच अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लादले आहेत. इराणला केवळ औषधे आणि आवश्यक सामग्रीच आयात करता येतेय.
मित्रांनी निराश केले
रुहानी यांनी कुठल्याच मित्रदेशाचे नाव घेतले नाही, परंतु या देशांच्या भूमिकेमुळे इराण अत्यंत निराश असल्याचे स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना संकट पोहोचल्यावर कुणीच आमच्या मदतीसाठी सरसावले नाही. आमचे मित्रदेशही अमेरिकेच्या निर्बंधांच्या भीतीपोटी मदतीस तयार झाले नाहीत. किमान या संकटात तरी त्यांनी आमची मदत करणे आवश्यक होते. इराण कोरोना महामारीमुळे सर्वाधिक ग्रस्त होणाऱया देशांपैकी एक असल्याचे रुहानी म्हणाले.
निर्बंध हटविणे अपेक्षित
अमेरिकेसंबंधी रुहानी यांची भूमिका पूर्वीप्रमाणे कठोर दिसून आली नाही. अमेरिकेच्या प्रशासनाने या अवघडकाळात माणुसकीच्या नात्यातून आमची मदत करणे अपेक्षित होते, अमेरिकेकडे काही प्रमाणात तरी माणुसकी असेल, त्याने किमान एक वर्षासाठी इराणवरील निर्बंध हटवावेत. परंतु आतापर्यंत असे घडलेले नाही. आम्ही 7 महिन्यांपासून महामारीला तोंड देत आहोत. अमेरिकेमुळे एकही देश आमच्यासोबत उभा राहिला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
खामैनी यांचा अडसर
रुहानी यांनी केलेला हा दावा पूर्णपणे खरा निश्चितच नाही. मार्च महिन्यात अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने एक राजनयिक पत्रक आणि पत्रकार परिषदेद्वारे इराणच्या मदतीसाठी तयार असल्याचे म्हटले होते. ही मदत संयुक्त राष्ट्रसंघाद्वारेही पोहोचविली जाऊ शकते असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने सांगितले होते. परंतु इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्लाह खामैनी यांनी हा प्रस्ताव फेटाळला होता. अमेरिकेवर विश्वास ठेवला जाऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.









