ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगात कोरोना रुग्णांची संख्या 68 लाख 79 हजार 502 वर पोहचली आहे. तर आता पर्यंत कोरोनामुळे 3 लाख 98 हजार 737 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यातच अमेरिकेनंतर आता ब्राझीलने देखील आता जागतिक आरोग्य संघटनेवर (डब्ल्यूएचओ) पक्षपाती असण्याचा आरोप करत बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. सध्या ब्राझील मध्ये कोरोनामुळे 35 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बॉल्सोनारो यांनी म्हटले की, जोपर्यंत डब्ल्यूएचओ पक्षपाती धोरण सोडत नाही, तोपर्यंत या जागतिक संघटने बरोबर असलेले संबंध संपवण्याचा विचार करत आहे. हे तेच राष्ट्रपती आहेत ज्यांनी लॉक डाऊनला विरोध करत सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्याचे समर्थन केले होते.
दरम्यान, डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्या मार्गरेट हैरिस यांनी जेनेवामध्ये सांगितले होते की, कोरोना महामारीचा लॅटीन अमेरिकेत प्रादुर्भाव अधिक आहे. मिळालेल्या एका माहितीनुसार, लॅटीन अमेरिकेसोबत पश्चिम आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये या महामारीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
ब्राझीलमध्ये मागील चार दिवसात एक लाख पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. तर मेक्सिकोमध्ये एका दिवसात चार हजार पेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत.









