वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी होणाऱया अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी दुसरा आणि अखेरचा अध्यक्षीय वादवाद गुरुवारी होणार आहे. वादविवादादरम्यान म्यूट बटनचा वापर होणार असल्याचे कमिशन ऑन प्रेसिडेंशियल डिबेटने (सीपीडी) स्पष्ट केले आहे. या बटनच्या वापराद्वारे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडेन परस्परांना बोलण्यापासून रोखू शकणार नाहीत. पहिल्या वादविवादात रोखण्यात आल्याने अनेकदा विचित्र स्थिती निर्माण झाली होती.
पहिला वादविवाद 29 सप्टेंबर रोजी पार पडला होता. दुसरा वादविवाद अध्यक्ष ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याने रद्द करण्यात आला होता. पहिल्या वादविवादादरम्यान सूत्रसंचालक ख्रिस वॉलेस आणि प्रेक्षकांसमोर विचित्र स्थिती निर्माण झाली होती. नियमांचे उल्लंघन करून दोन्ही नेत्यांनी अनेकदा परस्परांना रोखले होते.
सीपीडीने हे प्रकार रोखण्यासाठी आता म्यूट बटनचा उपाय शोधून काढला आहे. ओपनिंग रिमार्क्सदरम्यान प्रत्येक उमेदवाराचा मायक्रोफोन दोन मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मॉडरेटर प्रश्न विचारत असताना उत्तर देणाऱया उमेदवाराचाच माइक सुरू राहणार आहे. वादविवादाला 15-15 मिनिटांच्या 6 भागांमध्ये विभागण्यात आले आहे. बटन म्यूट करण्याच्या निर्णयावर ट्रम्प यांची प्रचारमोहीम नाखुश आहे.









