पुलित्झर पुरस्कार मिळविण्यासाठी आशियातील छायाचित्रकार आघाडीवर असतात. केवळ भारत आणि आशिया खंडावरील देशातच जणू असंतोष असल्याच्या छायाचित्रांसह बातम्या जगभरात पसरविल्या जातात. या देशात मानवता कशी धोक्यात आली याचे आंखोदेखाहाल दाखविले जातात. प्रत्यक्षात गोऱया लोकांच्या वर्णद्वेषाला बळी पडणाऱया बिगर गौरवर्णिय विशेषतः निग्रो अमेरिकन नागरिकांच्या बातम्या कुठल्यातरी कोपऱयात छापल्या जातात. पण पाच दिवसांपूर्वीच्या जगाच्या सुपर पॉवर देशात वंशवाद किती टोकाच्या भूमिकेत पोहोचला याची जाणिव संपूर्ण जगताला झाली.
जगभरातच नव्हे तर अमेरिकेतही दिवसाकाठी शेकडो हत्या होत असतात. त्याची दखल घेऊन एखाद्या देशात हिंसा घडण्याची क्वचितच घटना घडते. अमेरिकेत बुधवार 27 रोजी मिनियापोलिस शहरात एका निग्रोच्या हत्येने तीव्र पडसाद उमटले. या घटनेत 46 वर्षीय जॉर्ज फ्लोएड यांना एका निवृत्त पोलिस अधिकाऱयाने आपल्या गुडघ्याने गळा दाबून ठार केल्याचे समोर आले. या घटनेची खबर मिळताच शेकडो नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. दुसऱया दिवशी पोलिस अधिकारी या घटनेला दुसरे वळण देत असल्याचा सुगावा लागताच मिनियापोलिस शहरात एकदमच आगडोंब उसळला. ज्या पोलिस स्थानकाच्या कक्षेत ही घटना घडली ते पोलिस स्थानकच पेटवून दिले. दोन दिवसांनंतर संपूर्ण अमेरिकेत हिंसाचाराला सुरवात झाली.
प्रशासनाकडून भेदभाव
गोऱया अमेरिकन नागरिकांकडून आता स्थानिक निग्रो आणि अन्य बिगर गोऱया नागरिकांना सापत्न वागणूक दिवसेंदिवस वाढत आहे. गोरे सरकारी अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्याकडून मिळणारी भेदभावपूर्ण वागणूक वाढत आहे. तसेच बिगर गोऱया नागरिकांची नवीन पिढी या वाढत्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी पुढे आल्याने त्यांचा आवाज आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. सोशल मिडियामुळे आज गोऱया नागरिकांची बरीच गोची झाली आहे. गेल्या तीन वर्षात गोऱया नागरिकांच्या अत्याचाराविरोधात अनेकदा असंतोष उफाळला आहे.
राष्ट्राध्यक्षांचे राजकारण
मिनियापोलिस शहरावर डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता असून तेथील महापौर घटनेवर वेळीच तोडगा काढण्यास अपयशी ठरल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांनी व्ट्टि करून शहर प्रशासन आणि पोलिसांना हिंसेवर नियंत्रण मिळविण्यास अपयश आल्यास अमेरिकन सरकार लष्कराला पाचारण करणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या भूमिकेमुळे दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये बरीच जुंपली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्या तरी देशांतील वांशिक भेदभावावर बोलण्याचे दोन्ही राजकीय पक्षांकडून टाळले जात आहे. याचाच परिणाम अमेरिकेतील निग्रोंमधील असंतोष धगधगत राहतो. या हिंसाचारात लूटालूट असल्याच्या अफवाही उठत आहेत. त्यामुळे निग्रो नागरिकांना हिंसाचारासाठी जबाबदार धरताना लूटालुटीचा आरोप करून अपमानीत करण्याचे काम मात्र अमेरिकन प्रसार माध्यमे वांशिक भेदभावात आपला खारीचा वाटा उचलत आहेत.
2014 मधील घटनेची आठवण
सध्याच्या हिंसाचाराला 2014 मधील एरिक गार्नर या निग्रोच्या हत्येला कारणीभूत पोलिसांना न्यायालयाने दिलेले अभय प्रमुख कारण बनले आहे. एरिक गार्नर हत्येत सहभागी न्यूयॉर्क पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याची भूमिका सरकारी वकिलांनी घेतली होती. सरकारी पाठिंब्यामुळे मरण पावलेल्या एरिक गार्नरला न्याय मिळाला नसल्याची भावना बिगर गौरवर्णियांत बनली आहे. सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या विविध भागात असंतोष उफाळून आला होता. फ्लोएड यांच्या हत्येच्या एक दिवस अगोदर जॉर्जियातील तीन गोऱया नागरिकांना अहमद आब्रेम यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. या तिघांनी आपल्या सुरक्षेसाठी प्रयत्न करताना आब्रेम हा निग्रो मारला गेल्याचा युक्तिवाद सरकारी अधियोक्त्यांनी केला होता. मात्र स्थानिक बिगर गौरवर्णियांकडून दबाव वाढल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली होती. या घटनेला चौविस तास उलटताक्षणीच फ्लोएड यांची एका माजी पोलिस अधिकाऱयाकडून गुडघ्याखाली गळा दाबून हत्या झाल्याने संपूर्ण देशात हिंसाचाराचे गालबोट लागले.
अमेरिकेत कोरोना बळींची संख्या लाखांवर गेल्याने बलाढय़ अमेरिकन नागरिकांना बराच धक्का बसला आहे. त्यांच्यात अमेरिकन प्रशासन आणि राष्ट्राध्यक्ष यांच्याबद्दल बराच रोष आहे. तो केव्हाही उफाळण्याची चिंता गेल्या दोन महिन्यांपासून मानसोपचार तज्ञांकडून व्यक्त होत होती. तसेच कोरोनाच्या महामारीतही गौरवर्णियांना अमेरिकन आरोग्य यंत्रणेकडून मिळत असलेली सापत्न भावनेची वागणूक अधिक घायाळ करणारी ठरली आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होणारी गैर वक्तवे आगीत तेल ओतणारी ठरली आहेत. अमेरिकेतील हा आगडोंब वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्यातून ऐतिहासिक धमाक्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पी. कामत
वर्णद्वेषाचा भडका
अमेरिकेसारख्या संपन्न देशात हिंसाचार होत असल्याच्या बातम्या कधी वाचनात येतच नाहीत. न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट आणि अन्य अमेरिकन तसेच युरोपियन प्रसारमाध्यमे या देशांतील वांशिक हिंसेवर पांघरुण घालण्याचे काम करत असतात. अमेरिकेत अनेक ठिकाणी वांशिक आधारावर निग्रो आणि अन्य नागरिकांचे शोषण होत असते. त्याच्या बातम्या कधी देण्याची गरज मानवी अधिकारांचा ठेका घेतलेल्या या प्रसारमाध्यमांना भासत नाही. केवळ प्लोएड या निग्रो तरुणाच्या हत्येचा हा मुद्दा नसून एक माजी पोलिस अधिकारी अमानवी पद्धतीने भर दिवसा हत्या करतो आणि त्याला डय़ुटीवरील पोलिस अधिकारी पाठिशी घालण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत आक्षेपार्ह ठरला. अशा प्रकारच्या अमानवी हरकतींना अमेरिकेतील निग्रो नागरिक प्रत्येकवेळी बळी ठरतात. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या वांशिक हत्याचाराला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हा हिंसाचार उफाळून आला आहे.