अमेरिकेत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी आणि वृद्धांना लस दिली जात आहे, परंतु प्राथमिकता यादीत नसलेले लोकही लसीकरणात सामील होत असल्याच्या तक्रारी अनेक केंद्रांवरून प्राप्त झाल्या आहेत.
न्यूयॉर्कच्या सर्वात प्रतिष्ठित रुग्णालयांपैकी एक मॉर्गन स्टेनली चिल्ड्रन रुग्णालयात नवव्या मजल्यावर रांगेत असलेल्या लोकांवर नजर ठेवली जात नसून कुणीही यात सामील होऊन लस टोचून घेत असल्याचे दिसून आले. अशाप्रकारच्या घटना अमेरिकेत अन्य लसीकरण केंद्रांवरही घडल्या आहेत. नियमांनुसार सर्वाधिक धोका असलेल्या आरोग्य कर्मचाऱयांना सर्वप्रथम लस दिली जात आहे. परंतु महामारीच्या काळात बहुतांश वेळ वर्क फ्रॉम होम करणारे लोकही लसीकरणाच्या रांगेत उभे राहत आहेत. ज्या रुग्णालयांमध्ये अशी प्रकरणे घडली आहेत, तेथील व्यवस्थापनाने याकरता माफी मागितली आहे. लोकांमध्ये अशा घटनांवरून तीव्र आक्रोश आहे.
डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱयांनी लस वितरणाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु कुणीच स्वतःचे नाव जाहीर करू इच्छित नाही. याविषयी वाच्यता करणाऱया कर्मचाऱयांना नोकरीतून हाकलण्याचा इशारा रुग्णालयांनी दिला आहे.









