ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची आंदोलकांनी विटंबना केली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. युनायटेड स्टेट पार्क पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
मिनियापोलीस येथे मागील आठवड्यात जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन अमेरिकी व्यक्तीचा श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने गुडघा मानेवर दाबून घुसमटवल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे शुक्रवारपासून अमेरिकेत हिंसाचार उसळला आहे.
फ्लॉईड यांच्या हत्येच्या निषेधार्थ अमेरिकेतील 24 राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. जाळपोळ, लूटमार, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेतील 24 राज्यात 17 हजार सैनिक रस्त्यावर उतरवण्यात आले आहेत.









