ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत 11 किंवा 12 डिसेंबरपासून कोरोनावरील लसीच्या वितरणाला सुरुवात होईल, असे अमेरिकेतील लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉक्टर मोनसेफ स्लाउ यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील मॉडर्ना आणि फायजर या कंपन्यांच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या लसीबाबतच्या समितीची 10 डिसेंबरला बैठक होणार आहे. बैठकीत लसीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर 24 तासात लस वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे 11 किंवा 12 डिसेंबरला लस वितरणाची मोहीम सुरू होईल, असे स्लाउ यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेत दररोज सरासरी सव्वा लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत असून, रुग्णसंख्या 1.25 कोटींच्यावर पोहचली आहे. तर आतापर्यंत 2.62 लाख रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.









