ऍटलांटा / वृत्तसंस्था
अमेरिकेत जॉर्जियामधील ऍटलांटा शहरात तीन वेगवेगळय़ा स्पामध्ये झालेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आशियाई वंशाच्या 6 महिलांचा समावेश आहे. ऍटलांटाच्या उत्तरेकडील ऍकवर्थ शहरामध्ये एका मसाज पार्लरमध्ये झालेल्या गोळाबारात 4 जण मारले गेल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आणखी 2 स्पा मध्ये गोळीबार झाला असून तिथे आणखीन 4 जण मारले गेले आहेत. या तीनही हल्ल्यांमध्ये हात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी 21 वर्षांच्या एका तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.
गेल्याच आठवडय़ामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आशियान-अमेरिकन नागरिकांवर वंशद्वेषातून होणाऱया हल्ल्यांचा निषेध केला होता. ऍटलांटामधील पहिला गोळीबार ऍकवर्थमधल्या यंग्स एशियन मसाज पार्लरमध्ये झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. येथील गोळीबारानंतर तीन जखमींना इस्पितळात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये आशियाई वंशाच्या 2 महिला, एक श्वेतवर्णीय महिला आणि एका श्वेतवर्णीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच गोल्ड स्पामध्ये गोळीबारामुळे मृत होऊन पडलेल्या 3 महिला आढळल्या. तसेच समोरच असलेल्या अरोमा थेरपी स्पामध्ये आणखीन एक महिला गोळी लागून मृत झाल्याचे आढळून आले असून एकंदर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः आशियाई महिलांना लक्ष्य करून हे हल्ले घडविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
संशयित हल्लेखोर अटकेत
ऍटलांटा पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत आहेत. या हल्ल्यांच्या संशयिताचे एक छायाचित्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर क्रिस्प काऊंटीमधून 21 वर्षीय रॉबर्ट ऍरन लाँग नामक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. हीच व्यक्ती तीनही गोळीबारामागे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ऍटलांटा शहराचे मुख्य पोलीस अधिकारी रॉडनी ब्रायंट यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.









