ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 50 लाख 32 हजार 179 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 62 हजार 804 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत गुरुवारी 58 हजार 611 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1203 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले आहे. दररोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण आढळत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 50 लाख कोरोना रूग्णांपैकी 25 लाख 76 हजार 668 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 22 लाख 92 हजार 707 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 18 हजार 296 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 5 लाख 32 हजार 107 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 9872 जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 47 हजार 435 जणांना बाधा झाली असून, 32 हजार 811 रुग्ण दगावले आहेत. याशिवाय न्यू जर्सी, टेक्सास, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.









