ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांपार गेली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 30 लाख 41 हजार 129 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1 लाख 32 हजार 993 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत सोमवारी 50 हजार 586 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 378 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 30.41 लाख कोरोना रूग्णांपैकी 13 लाख 25 हजार 516 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 15 लाख 82 हजार 620 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 198 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. 4 लाख 22 हजार 851 जणांना न्यूयॉर्कमध्ये कोरोनाची बाधा झाली आहे. तर 32 हजार 267 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कॅलिफोर्नियात 2 लाख 77 हजार 433 जणांना बाधा झाली असून, 6 हजार 445 रुग्ण दगावले आहेत.









