ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 67 लाख 49 हजार 289 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 99 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
सोमवारी अमेरिकेत 38 हजार 072 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 480 जणांचा मृत्यू झाला. 67.49 लाख कोरोना रूग्णांपैकी 40 लाख 27 हजार 826 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 22 हजार 463 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 104 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 7 लाख 65 हजार 779 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 14 हजार 462 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 6 लाख 97 हजार 735 जणांना बाधा झाली असून, 14 हजार 582 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 78 हजार 379 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 128 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय न्यू जर्सी, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.









