ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत लाल आणि पिवळ्या कांद्यापासून सॅल्मोनेला बॅक्टेरियाचे संक्रमण होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेच्या 34 राज्यातील 400 जणांना या बॅक्टेरियाचे संक्रमण झाले आहे. अमेरिकेची आरोग्य संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने याबाबतची माहिती दिली आहे.
सॅल्मोनेला बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे नागरिकांमध्ये ताप, पोटदुखी, अतिसार ही लक्षणे दिसून येतात. 6 तासांपासून 6 दिवसात ही लक्षणे तीव्र होतात. हा बॅक्टेरिया आतड्यांना इजा पोचवतो. सॅल्मोनेला बॅक्टेरियाचे मुळ लाल रंगाच्या कांद्यात आहे. मात्र, लाल आणि पिवळे दोन्ही प्रकारचे कांदे खाल्ल्याने होत असलेल्या या संक्रमणाबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सीडीसीने लोकांना कांदा न खाण्यासाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत. ज्यांच्या घरात आधीपासूनच लाल, पिवळे कांदे आहेत, त्यांना फेकून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच थॉमसन इंटरनॅशनल या पुरवठादार संस्थेकडून लाल, पांढरा, पिवळा आणि गोड कांदा परत मागवण्यात आला आहे. दरम्यान, कॅनडामध्येही या आजाराचे 60 पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









