मराठीतील एक सुप्रसिद्ध नाटककार दिवंगत विजय तेंडुलकर हे त्यांच्या नव्या, धक्कादायक नाटय़विषयांबद्दल जितके चर्चेत होते व आहेत, त्याचप्रमाणे विविध सामाजिक विषयांवरील त्यांच्या मतांबद्दलही आहेत. ‘हिंसा’ या विषयावर त्यांनी लक्षणीय मत मांडून ठेवले आहे. ते म्हणतात, ‘माणसे आजही क्रूर आहेत आणि कित्येकदा सबळ कारणाशिवाय क्रूर होतात, ‘सॅडिस्ट’ होतात. सामूहिक हिंसा आणि क्रौर्य आजही भरपूर आहे. माणसाच्या आजवरच्या सांस्कृतिक विकासातही जे कायम राहिले आहे, ते मुळातले नाही म्हणणे हे स्वप्नरंजन ठरेल. आणि जे मुळात आहे ते फार तर आवरता येईल. त्याचे नियंत्रण काही प्रमाणात करता येईल. परंतु, ते नष्ट होणार नाही. ते आहे आणि असणार हे मान्य करूनच माणसाचा विचार झाला पाहिजे. एरवी ती फसवणूक ठरेल.’ तेंडुलकरांचे हे मत आजही कसे लागू आहे हे दर्शविण्यासाठी दहशतवादी हिंसाचार, युपेनसारखा युद्धजन्य हिंसाचार, स्थानिक पातळीवर जगभरात या ना त्या कारणाने होणारा हिंसाचार इत्यादींची अनेक उदाहरणे देता येतील.
विशेष म्हणजे, अशा हिंसाचारापासून बालके आणि किशोरवयीन मुलांचीही सुटका नाही. साधारण पंधरा दिवसांपूर्वी अमेरिकेसारख्या जगातील संपन्न, प्रगत, लोकशाही देशातील, टेक्सासमधील युव्हाल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये प्रवेश करून एका बंदूकधाऱयाने 19 मुलांना व दोन शिक्षकांना ठार केले. हल्लेखोर बंदूकधाऱयाचे नाव साल्वादोर रामोस असे असून या हल्ल्यापूर्वी त्याने आपल्या आजीच्या चेहऱयावर गोळी झाडून तिला तशाच जखमी अवस्थेत घरात ठेवले आणि त्यानंतर एक ट्रकद्वारे रॉब एलिमेंटरी स्कूलचे कुंपण तोडून त्याने थेट शाळेत प्रवेश केला. त्यानंतर ही दुर्घटना घडली. सदर हल्लेखोर साल्वादोर रामोस हा अवघा 18 वर्षांचा असून पुढे पोलीस गोळीबारात तो मृत्यू पावला. प्रत्यक्ष अमेरिकन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या अशा हल्ल्यांपैकी एक मोठा व प्राणघातक स्वरुपाचा सदर हल्ला होता. या हल्ल्याने अमेरिका आणि जगभरात खळबळ माजली असली तरी या प्रकारच्या हल्ल्यांच्या अमेरिकन इतिहासात हे केवळ हिमनगाचे टोक वाटेल अशी एकूण स्थिती आहे. या हल्ल्यानंतर लागलीच अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यांनी पुढे असे हल्ले होऊन सामूहिक हिंसाचाराचे प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासन उपाययोजना करेल, असे आश्वासन दिले.
तथापि, अमेरिकेतील शाळांत होणाऱया गोळीबारांच्या घटना आणि त्यात होणारी प्राणहानी याचा इतिहास आणि आकडेवारी तपासता, अध्यक्ष ज्यो बायडेन यांना या प्रकारांवर उपाययोजना करणे कितपत शक्मय आहे, याचीच शंका येऊ लागते. मागील चाळीसएक वर्षांचा इतिहास पाहिल्यास बंदुकीधारीत हिंसाचार आणि शाळांतील गोळीबार याची ‘साथ’ ही अमेरिकेची कायमची डोकेदुखी बनून राहिली आहे. एका विश्वसनीय सर्वेक्षणाच्या आधारे जाहीर झालेली माहिती पाहिल्यास या समस्येची भयावहता आणि व्यापकता ध्यानी येते.
प्रत्येक दिवशी 12 मुले अमेरिकेत बंदुकीधारीत हिंसाचारात मारली जातात. 32 जणांना गोळी लागून ती जखम वा अत्यवस्थ होतात. बंदुकी हे मुले व षोडशवषीय किशोर मरण्याचे अमेरिकेत एक मुख्य कारण आहे. 1970 पासून अमेरिकेत 2040 शाळेत गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होते आहे. 2012 डिसेंबरमधील सँडी हुक एलिमेंटरी स्कूल गोळीबारानंतर 2020 पर्यंत 948 शाळांत विविध ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. 2020 ते 2022 पर्यंत घडलेल्या अशा घटनांची संख्या देखील हिंसाचाराचा चढता आलेख दर्शविणारी आहे, हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्मयुरिटी रिसर्च’ या संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे जर बंदुकीधारीत हिंसाचाराची चिन्हे किंवा लक्षणे माहीत असतील तर अशा हिंसाचारास अटकाव होऊ शकतो. आजमितीस सुमारे 50 लाख अमेरिकन मुले अशा घरात राहतात, की जेथे भरलेली आणि चालू स्थितीतील किमान एक तरी बंदूक अस्तित्वात असते. या घटनातील हल्लेखोरांचे सरासरी वय 18 असते हे एकूण संशोधनातून उघड झालेले सत्य ध्यानात घेता अगदी लहान आणि अपरिपक्व वयात हिंसेस प्रवृत्त होणाऱयांची संख्या मोठी आहे. अशा प्रवृत्तींच्या हाती या सहजपणे उपलब्ध होणाऱया, असुरक्षित स्थितीतील बंदुका लागून मग पुढे हिंसाचारास चालना मिळते.
ज्यांच्या घरात बंदुका, पिस्तूल अशी शस्त्रास्त्रs असतात. त्यांच्यापैकी जवळपास संख्येने अर्ध्या पालकांचा गैरसमज असतो, की त्यांच्या मुलांना शस्त्रास्त्रs कुठे आहेत? हे माहीत नाही. अशा पालकांनी शस्त्रास्त्रs सुरक्षित ठिकाणी ठेवली तर हिंसाचाराच्या घटना कमी होतील. शाळा गोळीबारातील पाच घटनांपैकी चार घटनांत किमान एका व्यक्तीस हल्लेखोराच्या योजनेची कल्पना असते. परंतु, ती व्यक्ती या ना त्या कारणामुळे माहिती देण्यात अपयशी ठरते. म्हणूनच या प्रकारच्या घटनांचे गांभीर्य ध्यानी घेऊन अशा व्यक्तींनी संबंधित सुरक्षा यंत्रणांना सतर्क करणे अधिक गरजेचे आहे. शाळांत गोळीबार करणारे 93 टक्के हल्लेखोर अशा हल्ल्यांची योजना आधीच आखतात. त्यापैकी बरेचजण भीतीदायक संदेश आणि प्रतिमा विविध माध्यमातून पाठवतात. 75 टक्क्मयांपेक्षा अधिक हल्लेखोर त्यांच्या संशयास्पद हालचालींनी आणि इतर लक्षणांद्वारे सूचक इशारे देतात. हे सारे ध्यानी घेऊन प्रबोधन आणि दक्षता घेतली तर हल्ले टळू शकतात.
शाळातील गोळीबारांच्या घटनांतून हे देखील नजरेस आले आहे, की काळय़ा वर्णाची मुले गोऱया मुलांच्या तुलनेत चौपटीने अशा हल्ल्यांचे बळी ठरतात. याचाच अर्थ अशा हल्ल्यांना बऱयाच अंशी एक वर्णद्वेषी आयाम असतो. शाळांवर हल्ला करून गोळीबार करणाऱयांपैकी बहुतांशी हल्लेखोरांचा त्यांचे लक्ष्य असलेल्या शाळेशी संबंध असतो. ते शाळेचे माजी किंवा सद्यकालीन विद्यार्थी असतात. या हल्लेखोरांच्या मानसिकतेचा जो अभ्यास केला गेला, त्यातून हे निष्पन्न झाले आहे, की काही हल्लेखोर हे कुप्रसिद्धतेतून आपले नाव करण्याच्या मनोविकृतीतून असे हल्ले करतात.
तथापि, शाळांवर हल्ले करणारे बरेच हल्लेखोर हे समाजावरील रागामुळे हल्ल्यास प्रवृत्त होतात. स्वतःचाच तिरस्कार आणि वैफल्य याचे मिश्रण त्यांना बाहेरील जगावर राग व्यक्त करण्यास भाग पाडते. अशावेळी आपण इजा पोहोचवणार आहोत, याची पूर्वसूचना संदेश वा प्रतिमातून देणे ही त्यांच्या अगतिक व उदध्वस्त मनःस्थितीची मदतीसाठीची अखेरची हाक असते.
या साऱया पूर्वसूचना आणि लक्षणे ध्यानात घेणे, यासंदर्भात समाज प्रबोधन करणे, मुख्य म्हणजे अमेरिकेतील शस्त्रास्त्रांच्या मुक्त आणि सहज व्यापारावर व वापरावर निर्बंध घालणे, शाळा परिसरात सुरक्षा वाढविणे हे उपायच या अमेरिकेतील शाळा हल्ल्यांची व हिंसाचाराची साथ आटोक्मयात आणू शकतात.
– अनिल आजगावकर








