देशातील शेतकरी आंदोलन कसे हाताळायचे याबाबत पंतप्रधानांपुढे पेच उभा राहिला असताना परराष्ट्र राजकारणात आता कशा प्रकारे चालायचे याबाबत त्यांना मंथन करावे लागणार आहे.
‘आधीच मर्कट त्यातच मद्य प्याला,’ असेच मावळते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत म्हणावे लागेल. गेल्या आठवडय़ात त्यांच्या हिंस्त्र समर्थकांनी वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिल या राजधानीच्या गाभाऱयातच जो गोंधळ घातला. त्यांना ट्रम्प यांनी कसे प्रक्षोभित केले. त्यानंतर ट्रम्प यांच्या लीला ‘मर्कट लीला’च होत्या असे सुजाण अमेरिकनांचेच नव्हे तर पूर्ण लोकशाही जगताचेच मत झाले नसते तरच नवल होते. येत्या आठवडय़ात त्यांना पदभ्रष्ट करण्याची कारवाई देखील होऊ शकते आणि नंतरच्या काळात त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हे दाखल करून खटलेही होऊ शकतात. पण एखादा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष एकविसाव्या शतकात गोऱया वर्णवर्चस्ववादाचा वापर करून असे काही करू शकतो असे अब्राहम लिंकन आणि मार्टिन लुथर किंगच्या लढय़ाची कल्पना असणारा कोणीही करू शकणार नाही.
अमेरिकेच्या कॅपिटल हिलवर ज्या घटना घडल्या त्या म्हणजे एक प्रकारे भारताला आणि विशेषतः सध्याच्या सरकारला एक चपराकच आहेत. कारण याच ट्रम्प महाशयांना परत राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठीचा प्रचार साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. सप्टेंबर 2019 मध्ये जेव्हा होस्टनच्या ‘होवडी मोदी’ रॅलीमध्ये पंत प्रधानांनी ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी हस्तांदोलन करताना करून देशवासियांना बुचकळय़ात टाकले होते. त्यावेळी विरोधी पक्षांनी तसेच जाणकारांनी भारताने अमेरिकेच्या अंतर्गत कारभारात अशाप्रकारे ढवळाढवळ करू नये असे सुचविले होते. पण त्यांचा सुज्ञपणाचा सल्ला झुगारला गेला होता. अजूनही सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखे नेते ट्रम्प हे अलीकडील काळातील भारतधार्जिणे राष्ट्राध्यक्ष होते असे सांगत त्यांची भलावण करताना दिसत आहेत.
स्वतःला कणखर भासवणारे नेते सर्वसमावेशक लोकशाहीला कसे घातक ठरतात याची अमेरिकन जनतेला जाणीव होत आहे. येत्या 20 तारखेला ट्रम्प यांना पराभूत करून निवडून आलेले जो बिडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारतील तेव्हा भारतीय पंतप्रधानांची ‘ट्रम्प स्तुती’ कितपत विसरतील अथवा भारताला शालजोडीतून कसे मारतील ते येत्या काळात दिसणार आहे. अलीकडील काळात चीनचा एक जागतिक शक्ती म्हणून उदय होत असताना अमेरिका ही अजूनही सर्वात मोठी जागतिक शक्ती आहे हे विसरून चालणार नाही. गेल्या वषी लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीनंतर अमेरिकेने भारताला काही सुप्त मदत केली होती हे आता गुपित राहिलेले नाही. आतादेखील चीनच्या ‘अ रे ला का रे’ असे प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला अमेरिकेची साथ लागणार आहे.
रशिया हा सोविएत युनिअन अस्तित्वात असताना भारताचा अतिजवळचा मित्र होता. इंदिरा गांधींच्या काळात त्याने भारताशी दोस्तीचा करार केला होता. 1971 साली पाकिस्तानची दोन शकले भारताने पाडली तेव्हा तत्कालीन अमेरिकन
राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हिंद महासागरात अमेरिकन लष्करी जहाज पाठवून भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सोविएत युनियनबरोबरील करार उपयोगी पडला होता. आता गेल्या चाळीस वर्षात जागतिक स्थिती बदलली असून रशिया हा आता चीनचा मिंधा देश झाला आहे. चीन हा अमेरिकेच्या पाठोपाठ मोठी अशी व्यापारी शक्ती बनला आहे आणि रशियन क्रूड तेल आणि खनिजे यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गेल्या वषी चीनसहित AएAिंऱ देशांशी व्यापार करार करण्यात भारताने शेवटच्या क्षणी अंग काढून घेतले होते. युरोपियन युनिअन बरोबर चीनने गेल्या आठवडय़ात व्यापार करार केला आणि भारताबरोबरील युरोपच्या अशा कराराचे भिजत घोंगडे बरीच वर्षे पडून आहे. सांगण्याचे तात्पर्य हे की भारत अलीकडील काळात खूप पुढे गेला आहे अशा कितीही बढाया मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात चीनने फार आघाडी मारली आहे. अलीकडील काळात म्हणूनच रशियाने नवीन राग आळणे सुरु केले आहे. इंडो-पॅसिफिक महासागरात भारताने अमेरिकेशी हातमिळवणी करून चीन विरुद्ध मोर्चेबांधणी करू नये असा नवी दिल्लीला मॉस्को शहाजोगपणे सल्ला देऊ लागला आहे. लडाखमधील चीनच्या घुसखोरीकडे एकप्रकारे रशियाने डोळेझाक केली आहे. रशियन नेते व्लादिमिर पुतीन यांचे अमेरिकेशी अजिबात सख्य नाही. रशिया विरुद्ध अनेक व्यापारी बंधने अमेरिकेने घातली आहेत.
गेल्या 2-3 दशकात भारताची नैय्या ही सर्व बाबतीत पूर्णपणे अमेरिकेच्या किनाऱयाला लागली. हा प्रवास मनमोहनसिंग सरकार असतानाच जोरदार झाला होता तो मोदी पंतप्रधान झाल्यापासून जणू पूर्णत्वाकडे जात आहे. याचे बरेवाईट परिणाम भारताला त्यामुळेच भोगावे लागत आहेत सोविएत युनियनच्या विघटनापासून अमेरिका ही एकमेव महाशक्ती राहिली होती आता शी जीन पिंग यांच्या नेतृत्वाखालील चीन हा अमेरिकेशी बरोबरी करू पाहत आहे.
ट्रम्प समर्थकांनी गेल्या आठवडय़ात घातलेल्या गोंधळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याविरुद्ध आवाज उठवून तिथे शांतपणे सत्ताबदलाचे समर्थन केले होते. पंतप्रधानांनी अशी स्पष्ट भूमिका घेऊनदेखील गेल्या वर्ष-दोन वर्षातील घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्याबरोबर मोदींची तुलना केली जात आहे हे खचितच चांगले नाही. जो बिडेन म्हातारे आहेत पण अडाणी नाहीत. अलीकडील काळातील ते एक उत्तम अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनतील असे जाणकार भाकित करत आहेत. बिडेन यांच्या पत्नी जील या एका कॉलेजमध्ये शिक्षिका आहेत. ते राष्ट्रपती म्हणून व्हाईट हाऊस मध्ये राहायला आले तरी जील आपले शिकवणे चालू ठेवणार आहेत.देशातील शेतकरी आंदोलन कसे हाताळावयाचे याबाबत पंतप्रधानांपुढे पेच उभा राहिला असताना परराष्ट्र राजकारणात आता कशा प्रकारे चालावयाचे याबाबत त्यांना मंथन करावे लागणार आहे. पुढील वाट सोपी आहे असे म्हणणे अवघड आहे.
सुनील गाताडे








