वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी अमेरिकेचे सैन्यप्रमुख जनरल जेम्स सी. मॅक्कोनविले यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. दोन्ही सैन्यप्रमुखांदरम्यान द्विपक्षीय सैन्य संबंधांमध्ये मजबुती आणणे तसेच कोविड-19 महामारीला प्रभावीपणे तोंड देण्यावर चर्चा झाली आहे.

नरवणे आणि मॅक्कोनविले यांनी क्षेत्रीय सुरक्षास्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सैन्यांदरम्यान सहकार्याच्या विस्ताराच्या पद्धतींवर चर्चा केली आहे. भारतीय सैन्याने ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. दोन्ही सैन्यप्रमुखांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या मुद्दय़ांवर भूमिका मांडली आहे.
भारत आणि अमेरिकेदरम्यान सैन्य संबंधांमध्ये मागील काही वर्षांत मोठी प्रगती झाली आहे. अमेरिका आता भारताचा मुख्य संरक्षण पुरवठादार ठरला आहे. चीनचे आव्हान पाहता दोन्ही देशांनी संरक्षणक्षेत्रातील भागीदारी वाढविली आहे. मागली काही वर्षांमध्ये अमेरिकेने भारताला अनेक महत्त्वाची संरक्षण उत्पादने पुरविली आहेत.
सीमावर्ती भागाच्या दौऱयावर
सैन्यप्रमुख नरवणे यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरचा दौरा करत तेथील स्थितीचा आढावा घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया आणि सैन्याकडून होणाऱया कारवाईदरम्यान सैन्यप्रमुख तेथे पोहोचले आहेत. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासह नरवणे यांनी सीमावर्ती भागात जात तेथे तैनात सैन्याच्या तुकडय़ांशी संवाद साधला आहे. अखनूर, राजौरी आणि नौशेरा सेक्टरचा त्यांनी दौरा केला आहे.









