कोलोराडो येथील घटना – पोलीस अधिकाऱयासह 10 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था / कोलोराडो
अमेरिकेच्या बाउल्डर येथे एका व्यक्तीने सोमवारी सुपरमार्केटमध्ये बेछूट गोळीबार केला आहे. कोलोराडोच्या किंग सुपर मार्केटमध्ये झालेल्या या घटनेत 10 जण मारले गेले आहेत. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱयाचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आरोपी जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबारातील मृतांचा आकडा अद्याप निश्चित असल्याचे बाउल्ड पोलीस कमांडर कैरी यमागुची यांनी सांगितले आहे. प्रशासनाला मृतांच्या आकडय़ांचा अंदाज आहे. पण मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने हा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. गोळीबारामागील उद्देश अद्याप स्पष्ट झाला नसल्याचे बाउल्डरचे ऍटर्नी जनरल मायकल डॉगर्टी यांनी सांगितले आहे.
स्वॅट टीमसह लॉ इन्फोर्समेंट व्हेईकल आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तर 3 हेलिकॉप्टर्सच्या मदतीने परिसरावर देखरेख ठेवण्यात येत आहे. तपासानंतर पूर्ण माहिती जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचे समजते. 3 वर्षांपूर्वी कोलोराडोमध्येच झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर एक महिला जखमी झाली होती. ही घटना थॉर्नटन येथील एका वॉलमार्ट स्टोअरनजीक घडली होती.









