ऑनलाईन टीम/तरुण भारत
अमेरिका-कॅनडाच्या सीमेवर एका चिमुकल्यासह ४ भारतीयांचा मृत्यू झाला. कॅनडातून अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करताना ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. यावर आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. ही घटना ऐकून धक्का बसला आहे, अशी भावना जयशंकर यांनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्वीट करत, “कॅनडा-अमेरिका सीमेवर एका चिमुरड्यासह ४ भारतीयांच्या मृत्यूचं वृत्त ऐकून धक्का बसला. मी अमेरिका आणि कॅनडातील भारतीय राजदुतांना तात्काळ या परिस्थितीवर हालचाली करण्याचे निर्देश दिले आहेत.” असे त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, अमेरिकेच्या लगत असलेल्या कॅनडाच्या सीमेवर झालेल्या एका अपघातात एकाच परिवारातल्या चार सदस्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. हे चौघेही भारतीय नागरिक आहेत. मृतांमध्ये एका नवजात शिशूचाही समावेश आहे. या प्रकरणाचा संबंध मानवी तस्करीशी जोडला जात आहे.
मॅनटोबा रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की एमर्सन परिसराजवळ कॅनडा-अमेरिका सीमेवर कॅनडाजवळ बुधवारी चार मृतदेह सापडले आहेत, ज्यात दोन मृतदेह प्रौढ व्यक्तींचे असून एक किशोरवयीन व्यक्तीचा आणि एक नवजात शिशूचा समावेश आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मृत्यू झालेल्या व्यक्ती भारतातून आले होते आणि कॅनडामधून अमेरिकेच्या सीमेतून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. सहायक पोलीस आयुक्त जेन मैक्लेची यांनी गुरुवारी सांगितलं, मी आज जी माहिती देणार आहे ती अनेकांना ऐकवणार नाही. ही एक खूप दुःखद घटना आहे. प्राथमिक तपासानुसार, असं वाटत आहे की या सर्वांचा मृत्यू गारठल्याने झालेला आहे.
मैक्लेची यांनी सांगितलं की, पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, हे चौघेही सीमेजवळच्या अमेरिकेच्या भागातून पकडण्यात आलेल्या एक गटातले होते. चारही मृतदेह सीमेपासून ९ ते १२ मीटरच्या अंतरावर आढळून आले आहे. अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एमर्सन परिसरातून एक गट सीमा ओलांडून अमेरिकेत दाखल झाला आहे. एका प्रौढ व्यक्तीकडे लहान मुलाच्या काही वस्तू आहेत, मात्र या गटात कोणताही नवजात शिशू नाही.
यानंतर लगेचच सीमेच्या दोन्ही बाजूंना सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि दुपारी दोन प्रौढ व्यक्ती आणि एका नवजात शिशूचा मृतदेह आढळून आला. किशोरवयीन व्यक्तीचा मृतदेह मात्र काही वेळानंतर आढळला आहे. मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे.