कोरोनाच्या फैलावाच्या मार्गावरून गोंधळ : हवेत उडणारे कण संसर्ग फैलावण्याचा अहवाल नाकारला
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलने काही दिवसांपूर्वी नवी मार्गदर्शन तत्वे प्रसिद्ध केली होती. यात हवेत उडणारे कण विषाणू फैलावू शकतात असे नमूद करण्यात आले होते. परंतु यंत्रणेने स्वतःचा हा सल्ला मागे घेतला आहे. हा सल्ला यंत्रणेच्या संकेतस्थळावर चुकून प्रसारित झाला होता असे सीडीसीने आता म्हटले आहे. प्रकाशित दस्तऐवजात पहिल्यांदाच विषाणू प्रामुख्याने हवेत फैलावत असल्याचे मान्य करण्यात आले होते.
वैज्ञानिकांची चिंता वाढली
विषाणूमुळै अमेरिकेत बळींचा आकडा 2 लाखापर्यंत पोहोचला असताना मागदर्शक सूचनांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. वेगाने होत असलेल्या दिशादर्शक सूचनांमधील बदलांमुळे वैज्ञानिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. याचबरोबर यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अलिकडेच बदललेला निर्णय राजकीय हस्तक्षेपाऐजी यंत्रणेच्या वैज्ञानिक समीक्षा प्रक्रियेतील गोंधळ असल्याचे वाटत आहे असे मत एका जाणकाराने व्यक्त केले आहे.

तज्ञांकडून सवाल
सार्वजनिक आरोग्याशी संबंधित एखादा दस्तऐवज कुठल्याही महत्त्वाच्या तपासणीशिवाय प्रसारित कसा करण्यात आला हे समजून घेणे अवघड असल्याचे काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. यंत्रणेच्या प्रक्रियेचा आढावा घेत असून सर्व मार्गदर्शक सूचना आणि माहिती प्रसारित करण्यापूर्वी आढाव्याचे काम अधिक व्यापक करत आहोत असे सीडीसीचे प्रवक्ते जेसन मॅकडोनाल्ड यांनी सांगितले आहे. काही विशिष्ट ठिकाणी एअरोसोल भूमिका पार पाडतात. हे बहुतांशी बार, क्लब, जिम आणि रेस्टॉरंट यासारख्या खरब व्हेंटेलेशन असलेल्या ठिकाणी असतात.
हवेद्वारे फैलाव
कोरोना विषाणू खोकला किंवा शिंकल्यानंतर श्वासाच्या कणांद्वारे बाहेर पडून फैलावु शकतो हे वैज्ञानिक महामारीच्या प्रारंभापासूनच जाणून होते. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेसारख्या आरोग्य यंत्रणांनी संभाषण, श्वासोच्छवास किंवा गाताना बाहेर पडणाऱया एअरोसोलची भूमिका मानली. सीडीसीच्या नव्या दस्तऐवजात दोन्ही पद्धतींना एअरबोर्न ट्रान्समिशनचे नाव देण्यात आली होती.
एअरोसोल अन् ड्रॉपलेट्स
ड्रॉपलेट्स किंवा एअरोसोल्स या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. तर लोकांनी स्वतःला कशाप्रकारे सुरक्षित ठेवावे हे महत्त्वाचे असल्याचे काही तज्ञांचे मानणे आहे. एअरोसोलचा मुद्दा सार्वजनिक आरोग्य सूचनांमध्ये मांडला जावा असे मत व्हर्जिनिया टेकमधील एअरबोर्न विषाणूच्या तज्ञ लिंसे मार यांनी व्यक्त केले आहे.









