ड्रगनच्या मदतीने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार करतोय सौदी अरेबिया
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या विदेश धोरणावर प्रश्न उपस्थित होणे नवी बाब नव्हे. परंतु एका नव्या वृत्तामुळे संरक्षण आणि विदेश धोरणाप्रकरणी अमेरिकेच्या अडचणी वाढत असल्याचे समोर आले आहे. चीनने अत्यंत गुप्तपणे अरब देशांमध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण केला आहे. विशेषकरून अमेरिकेच्या प्रेंडशिफ सर्कलमध्ये असलेल्या आखाती देशांमध्येही चीनची घुसखोरी झाली आहे. अमेरिकेचा सर्वात जवळचा सहकारी असलेल्या सौदी अरेबियाने स्वतःच्याच देशात चीनच्या मदतीने एक गुप्त तळ तयार केला असून तेथे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची निर्मिती केली जात आहे.
या तळाची उपग्रहीय छायाचित्रे समोर आली आहेत. क्षेपणास्त्र विकासातही चीन सौदी अरेबियाला मदत करत आहे. बायडेन प्रशासनाने अद्याप या खुलाशावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेच्या सीएनएन वृत्तवाहिनीने देशाच्या गुप्तचर यंत्रणांकडील उपग्रहीय छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यात बांधकाम स्थळासह चाचणीनंतर कचऱयाची विल्हेवाट लावले जाणारे ठिकाणही दिसून येते.
चीन आता इराणची भीती दाखवून अरब देशांना स्वतःच्या जाळय़ात ओढत आहे. सौदी अरेबियाने पूर्वी देखील चीनकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs खरेदी केली आहेत. चीनने संवेदनशील तंत्रज्ञान देखील सौदी अरेबियाला हस्तांतरित केले आहे. एका ठिकाणाची ओळख अमेरिकेच्या यंत्रणांनी पटविली आहे. चीन आणि सौदी अरेबिया याप्रकरणी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
चीन का यशस्वी होतोय?
अमेरिका आणि इस्रायल, युरोप आणि अरब देश या सर्वांना इराणच्या आण्विक शक्तीमुळे धोका आहे. डोनाल्ड ट्रम्प हे इराणला आण्विक शक्ती होण्यापासून रोखू इच्छित होते. बायडेन यांनी याप्रकरणी अवलंबिलेला राजनयाचा मार्ग यशस्वी ठरलेला नाही. बायडेन यांनी सौदी अरेबिया आणि आखाती देशांना प्राधान्य दिलेले नाही. याचाच लाभ चीनने उचलला आहे. गुप्त आणि पडद्याआडून राजनयाच्या अंतर्गत सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देशांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सौदी अरेबियासोबत अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीन-सौदी संबंधांची कल्पना अमेरिकेच्या यंत्रणांना 2019 पासूनच असल्याचा दावा वृत्तवाहिनीने केला आहे.
अमेरिकेचे मौन
बायडेन यांच्यापूर्वी ट्रम्प यांनाही सौदी-चीन संगनमताची कल्पना होती. परंतु त्यांनीही कुठलेच पाऊल उचलले नाही. बायडेन यांची डेमोक्रेटिक पार्टी पूर्वी ट्रम्प यांच्यावर आरोप करत होती. आता ट्रम्प आरोप करत असून बायडेन प्रशासन मौन बाळगून आहे. अलिकडेच सुरक्षा समितीत सामील काही अमेरिकेच्या खासदारांनी याविषयी माहिती देण्यात आली. काही चिनी आणि सौदी कंपन्यांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. इराणचा मुकाबला करण्यासाठी सौदी अरेबियाने चीनशी जवळीक वाढविल्यास अरब देशांमध्ये शस्त्रास्त्रांची नवी स्पर्धा सुरू होण्याचा धोका आहे.









