6 किलोमीटरच्या परिघातील झाडे जळून खाक
वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये भीषण आगीने बिग सुर भागातील जंगलात मोठे नुकसान घडवून आणले आहे. आग अत्यंत वेगाने फैलावत असल्याने पूर्ण भाग निर्मनुष्य करत मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे. 80 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वाहणाऱया वाऱयांमुळे ही आग आता कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱयापर्यंत फैलावली आहे.
आगीमुळे 6 किलोमीटर क्षेत्रातील झाडे जळून खाक झाली आहेत. वेगवान वाऱयामुळे आग अत्यंत वेगाने फैलावत आहे. कार्मेल आणि बिग सुर यांच्यातील नागरी वस्तीचा भाग रिकामी करविला जात आहे. सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था मिळून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत केवळ 5 टक्के आगीलाच नियंत्रित करता आल्याची माहिती कॅलिफोर्नियाच्या वन विभागाचे प्रवक्ते सेसिल ज्यूलियट यांनी दिली आहे.
कॅलिफोर्नियाच्या सोनोमा काउंटीमध्ये अग्निशमन दलाने 5 एकरमधील आग विझविली आहे. परंतु सिएरा नेवादा आणि किर्कवुड माउंटेनमध्ये 226 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड ठरत आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या सांता क्लॅरिटामध्येही वेगाने वारे वाहत असल्याने अनेक वृक्ष आणि विजेच्या तारा कोसळल्या आहेत.









