वृत्तसंस्था / वॉशिंग्टन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील कोरोना चाचण्यांच्या प्रमाणावरून आपले कौतुक केल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मोदींनी फोन करून कोरोना चाचण्यांप्रकरणी कमालीचे काम केले आहे असे म्हटल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेतच आहेत.
नवादा येथील एका प्रचारसभेदरम्यान ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. आम्ही मोठमोठय़ा देशांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्या आहेत. अमेरिकेत भारतापेक्षाही अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात जवळपास दीडशे कोटी तर अमेरिकेत 30 कोटीच्या आसपास लोकसंख्या असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 44 दशलक्ष चाचण्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून माझ्या प्रशासनाचे कौतुक केले आहे. अमेरिकेतील बेईमान लोकांना ही बाब समजावा असे मोदींना सांगितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
चिनी विषाणू आला तेव्हा डेमोक्रेटिक ज्यो बिडेन देशाचे प्रमुख असते तर लाखो अमेरिकन नागरिकांना स्वतःचा जीव गमवावा लागला असता असे विधान ट्रम्प यांनी केले आहे. कोरोना संकट हाताळणे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरून ट्रम्प यांच्यावर विरोधकांकडून सध्या टीकेचा भडिमार सुरू आहे.
नवादा महत्त्वपूर्ण
ट्रम्प यांनी स्वतःच्या प्रचारमोहिमेत सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलेल्या ठिकाणांमध्ये नवादा सामील आहे. तेथे ट्रम्प अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याविषयीच्या स्वतःच्या धोरणांबद्दल लोकांमध्ये पुन्हा उत्साह जागवणे आणि हिस्पॅनिक मतदारांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.









